New Town Near Mumbai : मुंबई आणि नवी मुंबई शहराचा गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. गेल्या काही दशकात मुंबईमधली लोकसंख्या ही विक्रमी पातळीवर पोहचली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील पायाभूत सुविधेवर मोठा ताण येत आहे.
रस्ते, वीज, पाणी यांसारख्या सर्वच सुविधेवर ताण येऊ लागला आहे. यामुळे जीवाची मुंबई आता कष्टाची झाली आहे.मुंबईमध्ये वास्तव्य करणे आता अवघड झाले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
हेच कारण आहे की, आता महाराष्ट्र राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता राजधानी मुंबई जवळ एक नवीन शहर विकसित केले जाणार आहे.
यामुळे राजधानी मुंबईवरील ताण बऱ्यापैकी कमी होणार आहे. मुंबईमध्ये वास्तव्य करू पाहणाऱ्या नागरिकांना आणखी एक हक्काचा पर्याय मिळणार आहे. यामुळे शहरातील लोकसंख्या वाढीवर अंकुश लागणार आहे.
कुठं विकसित होणार नवीन शहर ?
नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई विमानतळाजवळ प्रस्तावित करण्यात आलेले नवीन शहर विकसित होणार अशी माहिती समोर आली आहे. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हे नवीन शहर तयार केले जाणार आहे.
उल्वे, पेण, पनवेल, उरण, कर्जत आणि आजुबाजूच्या परिसरातील 323 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे नवीन शहर तयार होणार आहे. यामध्ये ‘नैना’ प्रकल्पातील गावांचाही समावेश केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
या नवीन शहराला तिसरी मुंबई असे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोच्या माध्यमातून उरण आणि पनवेल मधील जवळपास 23 गावांमध्ये बारा हजार कोटी रुपये खर्च करून रस्ते तयार होणार आहेत.
या नव्याने विकसित होत असलेल्या शहरात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये निवासी संकुल, व्यावसायिक संकुल, डेटा सेंटर, मल्टिनॅशनल कंपन्या आणि नॉलेज पार्क विकसित होणार आहे.
नवीन शहरात रस्त्यांचे जाळे तयार होणार आहेत. विशेष म्हणजे या नवीन शहरात तयार होणारे रस्त्यांमध्ये कुठेही सिग्नल यंत्रणा किंवा चौक विकसित केला जाणार नाही.
म्हणजेच नवीन शहरातील रस्त्यांवर विना थांबा प्रवास करता येणार आहे. रस्त्यांची रचना ही एका सरळ रेषेत ठेवली जाणार आहे. ज्या ठिकाणी आवश्यक असेल तिथे उड्डाणपूल आणि अंडरपास तयार होणार आहेत.