Onion Harvesting Machine:- महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते व खासकरून नासिक आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. परंतु आता महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात कांद्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे सध्या चित्र आहे.
परंतु जर आपण कांदा या पिकाचा विचार केला तर या पिकासाठी सगळ्यात जास्त खर्च होत असेल तर तो कांद्याची लागवड आणि शेवटी म्हणजे कांद्याची काढणी करण्यावर. तसेच या दोन्ही प्रकारच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासते. मजुरांची टंचाई आणि वाढलेले मजुरी दराच्या पार्श्वभूमी कांदा काढणी साठी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागते.
परंतु आता भारतातील महत्त्वाचे कृषी विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे गोविंद वल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून आता कांदा काढण्याचे यंत्र विकसित करण्यात आलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात शेतकऱ्यांसाठी हे यंत्र उपलब्ध होण्याची शक्यता असून कांदा काढणी वरचा मजुरीचा जो काही खर्च आहे तो खर्च शेतकऱ्यांचा वाचेल अशी शक्यता या माध्यमातून निर्माण झाली आहे.
कांदा काढणी यंत्र शेतकऱ्यांसाठी होणार उपलब्ध
उत्तराखंड राज्यातील गोविंद बल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कृषी यांत्रिकीकरण विभागाचे प्रमुख डॉ. आर. एन. पटारीया यांनी याबाबत माहिती दिली व त्यांनी म्हटले की, उत्तराखंड पेक्षा देशातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश तसेच गुजरात आणि कर्नाटक या राज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे व या मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदा काढण्यासाठी मजुरी वरील जो काही खर्च किंवा मेहनत होते ती डोळ्यासमोर ठेवून हे कांदा काढणी यंत्र बनवण्यात आलेले आहे.
साधारणपणे हे यंत्र 2020 मध्येच विद्यापीठाकडून बनवण्यात आलेले असून लवकरच त्याला आता पेटंट मिळणार आहे. पेटंटची ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी ते उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या पद्धतीने करेल हे यंत्र कांदा काढणीचे काम
हे कांदा काढणी यंत्र ट्रॅक्टरचलित असून ते याकरिता ट्रॅक्टरला जोडणे गरजेचे आहे. साधारणपणे 15 ते 25 एचपीचा ट्रॅक्टर याकरिता आवश्यक आहे. यंत्राच्या साह्याने मातीतून कांदा काढण्याचे काम सहजपणे केले जाईल व यासोबतच कांद्याची पात आणि मुळ्या देखील बाजूला करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे यंत्र करेल.
हे देशातील पहिलेच कांदा काढणी यंत्र असून शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरणार आहे व कांदा काढणीवर जो काही प्रचंड प्रमाणात खर्च येतो तो देखील कमी होणार आहे. तुम्हाला माहित आहेस की साधारणपणे एक एकर कांदा काढायचा असेल तर साधारणपणे 15 ते 20 मजूर लागतात. त्यामुळे या यंत्राच्या साह्याने कांदा काढला तर मजुरांचा खर्च वाचणार आहे.
परंतु केव्हा करता येईल या यंत्राचा वापर?
साहजिकच आता बरेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न येईल ही जर या यंत्रामुळे कांदा काढला तर कांदा खराब होऊ शकतो किंवा त्याचे नासाडी होण्याची शक्यता आहे. हे काही अंशी सत्य देखील आहे. परंतु याबाबत विद्यापीठाने माहिती देताना म्हटले आहे की, विद्यापीठाने जे हे यंत्र तयार केले आहे ते कांदा काढण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.
परंतु जर शेतकऱ्यांना या काढणी यंत्राच्या साह्याने कांदा काढायचा असेल तर कांद्याची लागवड करताना ती एका विशिष्ट अंतरावर करणे गरजेचे राहील. तेव्हाच या यंत्राच्या साह्याने कांदा काढता येईल व कांद्याचे नुकसान देखील होणार नाही.