Onion Rate Maharashtra : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात टोमॅटोच्या चर्चा पाहायला मिळाल्यात. टोमॅटोचे बाजार भाव विक्रमी वाढले होते यामुळे सर्वत्र टोमॅटो बाजारभावाच्या चर्चा होत्या. टोमॅटोचे बाजारभाव दोनशे रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले होते.
यामुळे सर्वसामान्यांचे बजेट चांगलेच बिघडले. परिणामी सर्वत्र टोमॅटो विषयी चर्चा रंगत होत्या. पण टोमॅटोचे हे वादळ शमले आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. अशातच मात्र कांदा बाजार भावाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत.
कांद्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून विक्रमी वाढ झाली असल्याने गेली अनेक महिने कवडीमोल दरात विक्री होणारा कांदा चर्चेत आला आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या बाजारात कांद्याच्या सरासरी बाजारभावाने 2300 रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला आहे.
तर काही बाजारात कांद्याचे सरासरी बाजार भाव 2000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक झाले आहेत. विशेष म्हणजे किरकोळ बाजारात कांदा चाळीस रुपये प्रति किलो पेक्षा अधिक दरात विकला जात आहे. तसेच नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला होता की पुढल्या महिन्यात कांदा किरकोळ बाजारात 60 ते 70 रुपये प्रति किलो या भावात विकला जाणार आहे.
यामुळे घाऊक बाजारात देखील बाजारभावात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच मात्र नाफेडने बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात विक्रीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली. शेतकऱ्यांची नाराजी पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी ज्या राज्यांना कांद्याची गरज आहे त्याच राज्यात नाफेड कांदा विकणार असे स्पष्ट केले.
सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर कांदा दरवाढीला ब्रेक लागला आहे. मात्र दरात घसरण झालेली नाही. दरम्यान नाफेड 3 लाख मॅट्रिक टन कांदा खुल्या बाजारात विकणार आहे. देशाला मात्र दिवसाला 50 हजार टन कांद्याची गरज राहते. याचाच अर्थ नाफेडचा कांदा फक्त सहा दिवस पुरणार आहे. यामुळे नाफेड खुल्या बाजारात कांदा विकत असेल तरीदेखील याचा फारसा परिणाम बाजारभावावर होणार नसल्याचे चित्र आहे.
खरंतर रब्बी हंगामातील कांद्याला अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा मोठा फटका बसला. यामुळे रब्बी कांद्याची गुणवत्ता कमी झाली आहे. हा पावसात सापडलेला कांदा अधिक काळ टिकणार नाहीये. यामुळे यावर्षी जवळपास एक ते दीड महिना लवकरच रब्बी हंगामातील कांद्याची आवक कमी होणार आहे. दरवर्षी सप्टेंबर नंतर कांद्याची आवक कमी होते यावर्षी मात्र ऑगस्ट महिन्यापासूनच कांद्याची आवक कमी होत चालली आहे.
शिवाय मान्सूनच्या दिरंगाईमुळे खरीप हंगामातील कांदा देखील एक महिना उशिराने बाजारात येणार आहे. याचा परिणाम म्हणून आगामी काही दिवस बाजारातील ही तेजी कायम राहणार आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे देशांतर्गत कांद्याची वाढलेली मागणी, घटलेला पुरवठा आणि बांगलादेश मधून वाढणारी मागणी या सर्व पार्श्वभूमीवर कांदा दरवाढीसाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात बाजारभावात आणखी वाढ होण्याची शक्यता असून घाऊक बाजारात कांद्याला 3000 ते 4000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळू शकतो असा दावा केला जात आहे. ऑक्टोबर नंतर खरीप हंगामातील कांदा बाजारात येणार आहे मात्र पावसाची ही बिकट परिस्थिती पाहता खरीप हंगामातील कांदा देखील बाजारावर फारसा विपरीत परिणाम टाकणार नाही असे सांगितले जात आहे.