Onion Rate Maharashtra : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे मालाला चांगला भाव मिळत नाहीये. चांगला दर्जाचा माल देखील कवडीमोल दरात विकावा लागत आहे. परिस्थिती एवढी खराब बनली आहे की शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी झालेला खर्च देखील भरून काढता येत नाहीये.
एकीकडे कांदा पीक उत्पादित करण्यासाठी उत्पादनाचा खर्च वाढला आहे तर दुसरीकडे कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे आणि उत्पादित झालेल्या मालाला देखील अपेक्षित असा दर मिळत नाहीये. परिणामी हे पीक जरी नगदी पीक असले तरी देखील या पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित अशी कमाई होत नाहीये.
बाजारात चांगला कांदा हजार ते 1,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला जात होता. मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. चांगल्या कांद्याच्या दरात मोठी सुधारणा झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेले कांदा बाजार भाव आता वाढले आहेत. पुणे जिल्ह्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कांदा दरात विक्रमी वाढ झाली आहे.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. भालेराव यांनी सांगितल्याप्रमाणे, मंचर एपीएमसी मध्ये मंगळवारी झालेल्या लिलावात दहा किलो कांद्यास 250 रुपये एवढा दर मिळाला आहे.
मंगळवारी अर्थातच चार जुलै 2023 रोजी झालेल्या लिलावात मंचर एपीएमसीमध्ये एक नंबरचा गोळा कांदा 230 ते 250 रुपये, सुपर कांदा 130 ते 160 रुपये, गोल्टी कांदा 80 ते 130 रुपये, तसेच बदला कांदा 20 ते 130 रुपये प्रति दहा किलो या दरात विकला गेला आहे.
निश्चितच गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेले बाजार भाव कालच्या लिलावात वाढले असल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता शेतकऱ्यांना आगामी काळातही असेच दर तेजीत राहतील अशी आशा आहे. बाजार अभ्यासकांनी देखील आगामी काळात कांदा बाजारभाव तेजीत राहू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे.