Onion Rate : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून नेहमीच बाजारातील चढ-उताराचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अनेकदा कांदा खूपच कवडीमोल दरात विकावा लागतो. यामुळे कांदा पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नाही.
यामुळे ग्रामीण भागात कांद्यावर कोंबडीचा देखील व्यवहार करू नये अशी म्हण विशेष प्रचलित आहे. कांदा दरातील हाच लहरीपणा पाहता ग्रामीण भागात असं म्हटलं जात. दरम्यान या चालू वर्षात देखील बाजारात हाच लहरीपणा पाहायला मिळाला आहे. या चालू वर्षाच्या सुरुवातीला जवळपास पाच ते सहा महिने कांदा बाजार दबावत राहिला आहे.
जवळपास जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात कांदा बाजार दबावात आला आणि आता गेल्या महिन्यापर्यंत अर्थातच जून महिन्यापर्यंत बाजारातील दबाव कायम होता. मात्र जुलै महिन्याची सुरुवात शेतकऱ्यांसाठी थोडीशी आशादायी सिद्ध झाली आहे. कारण की कांदा बाजार पुन्हा एकदा तेजीत येऊ लागला आहे. कांदा बाजारातील ही तेजी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे.
जानेवारी ते जून या कालावधीत शेतकऱ्यांनी कित्येकदा कांदा मात्र दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विकला. मात्र आता कांद्याला एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत आहे. विशेष म्हणजे काही बाजारात 2,500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर नमूद केला जात आहे. काल झालेल्या लिलावात अर्थातच 29 जुलै 2023 ला झालेल्या लिलावात राज्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 2,781 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी दर नमूद करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काल पिंपळगाव बसवंत एपीएमसीमध्ये 15 हजार 700 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती आणि काल कांद्याला 350 रुपये प्रति क्विंटल किमान, 2781 रुपये कमाल आणि 1300 रुपये सरासरी भाव नमूद करण्यात आला आहे.
एकंदरीत काल पिंपळगाव एपीएमसीमध्ये कांद्याच्या कमाल बाजारभावात चांगली तेजी होती पण सरासरी दर हा अजूनही एक हजार 500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमीच आहे. विशेष म्हणजे राज्यातील इतरही बाजारात 850 रुपये प्रतिक्विंटल ते 1500 रुपये प्रति क्विंटल दरम्यानच सरासरी बाजार भाव नमूद केले जात आहेत. यामुळे सरासरी बाजारभावात वाढ व्हावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.