Onion Rate : आठ डिसेंबर 2023 ला केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सरकारने कांदा निर्यात बंदी जाहीर केली आहे. मात्र याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून सद्यस्थितीला देशांतर्गत कांदा बाजारभाव दबावात आहेत. त्यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नसल्याची वास्तविकता समोर आली आहे.
यामुळे कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. खरेतर निर्यात बंदीचा निर्णय झाला तेव्हा ही निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत सुरू राहील असे म्हटले गेले होते. पण, निर्यात बंदीची मुदत जवळ आल्यानंतर सरकारने पुन्हा एकदा निर्यात बंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत निर्यात बंदी अशीच सुरू राहणार असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आगामी काळात आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना फळबाग निर्यातदार असोसिएशनने निर्यात बंदी उठवण्यासाठी एक निवेदन दिले आहे.
या संस्थेने देशातून मार्च आणि एप्रिल या काळातच मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होत असल्याचे म्हटले आहे. तसेच मे महिन्यापासून उन्हाळ कांदा निर्यात कमी होत जाते. अशा परिस्थितीत, सध्या लागू असलेली निर्यात बंदी शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे.
खरे तर निर्यात बंदीला मुदतवाढ दिली असल्याने आता निर्यात बंदी नवीन सरकार स्थापित झाल्यानंतरच उठवली जाईल अशी शक्यता आहे.मात्र जर नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर निर्यात बंदी उठवली गेली तर तोपर्यंत बाजार भाव दबावत राहतील आणि उन्हाळी हंगामातील कांदा तोपर्यंत शिल्लक राहणार नाही.
म्हणजे शेतकऱ्यांना तोपर्यंत कमी भावात आपला सारा कांदा विकायला भाग पाडले जाणार आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर जरी कांदा निर्यात बंदी उठवली गेली तरी याचा शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार यांना फायदा होणार नाही.
यामुळे लवकरात लवकर निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे अशी मागणी या संस्थेने केली आहे. नवीन सरकार स्थापित होईपर्यंत निर्यात बंदी सुरू राहिली तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे यामुळे ताबडतोब ही निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे असे मत या संस्थेने व्यक्त केले आहे.
दुसरीकडे इजिप्त मधील कांदा निर्यात येत्या काही दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. तिथे विक्रमी पातळीवर कांद्याचे उत्पादन झाले आहे आणि त्या देशाची निर्यात सुरू झाली तर याचा विपरीत परिणाम बाजारावर पाहायला मिळणार आहे.
शिवाय रमजानचा महिना संपल्यानंतर पाकिस्तान देखील मोफत कांदा निर्यातीला परवानगी देऊ शकतो असे जाणकार लोकांचे म्हणणे आहे.यामुळे सरकारने ताबडतोब निर्यात बंदी उठवली पाहिजे आणि शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना तथा निर्यातदारांना थोडासा दिलासा दिला गेला पाहिजे अशी मागणी होत आहे.
तथापि आता या मागणीकडे सरकार कसे पाहते हे पाहण्यासारखे राहणार आहे. यावर जर सकारात्मक निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल. मात्र जर सरकारने यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर यंदा शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.