Panjab Dakh Havaman Andaj : सध्या महाराष्ट्रात जवळपास 20 दिवसांच्या खंडानंतर पावसाला सुरुवात झाली आहे. 23 जून पासून राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. अद्याप मात्र राज्यातील कोणत्याच भागात समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. पण सध्या सोशल मीडियामध्ये हवामानाचे अंदाज विशेष व्हायरल होत आहेत.
यात भारतीय हवामान विभागाने वर्तवलेले हवामान अंदाज आणि महाराष्ट्रात आपल्या हवामान अंदाजासाठी विशेष लोकप्रिय असलेल्या पंजाब डख यांच्या हवामान अंदाजात विशेष स्पर्धा पाहायला मिळत आहे. पंजाब डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजावर राज्यातील लाखो शेतकरी विश्वास ठेवतात. सध्या मात्र पंजाब डख हवामान अंदाजाऐवजी एका वेगळ्याच कारणाने प्रकाशझोतात आले आहेत. आपल्याला आठवतच असेल की, गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक रेकॉर्डिंग वेगाने वायरल झाली होती. या रेकॉर्डिंग मध्ये डक यांच्यावर पैसे घेऊन हवामान अंदाज दिला असल्याचा आरोप नासिक मधील एका शेतकऱ्याने केला होता.
तेव्हापासून पंजाब डख यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. भारतीय हवामान विभागातील हवामान शास्त्रज्ञांनी यापूर्वीच डख यांच्या हवामान अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशातच डख यांचा मान्सून 2023 बाबतचा सुरुवातीचा अंदाज फोल ठरला होता. यामुळे त्यांचे हवामान अंदाजाबाबत शेतकऱ्यांमध्ये देखील वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक लोकांनी त्यांचा हवामान अंदाज हा अंदाधुंद गोळीबारसारखा असून एखादी गोळी बरोबर लागते असं म्हणत त्यांच्या अंदाजाच्या विश्वासाहार्तेवर प्रश्न उभा केला आहे. तर अनेकांनी त्यांचे समर्थन देखील केले आहे. एकूणच डख सध्या त्यांच्या हवामान अंदाजाऐवजी दुसऱ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत.
अशातच आता सोशल मीडियामध्ये पंजाबराव डख यांनी 40 लाखांची फॉर्च्युनर खरेदी केल्याचे वृत्त वेगाने पसरत आहे. फेसबुक, व्हाट्सअप आणि instagram या तिन्हीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या या गोष्टीची चर्चा आहे. फेसबुकवर अनेक लोकांनी डख यांनी फॉर्च्युनर विकत घेतली असल्याची पोस्ट केली आहे. व्हाट्सअप स्टेटसवर देखील डख यांचा फॉर्च्यूनर सोबतचा फोटो वेगाने व्हायरल होत आहे.
यामुळे नुकत्याच काही दिवसांपूर्वी डख यांच्यावर पैसे घेऊन हवामान अंदाज देण्याचा आरोप लागला आणि आता त्यांनी चक्क चाळीस लाखांची गाडी घेतली यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये देखील दबक्या आवाजात याबाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक लोकांनी त्यांनी फॉर्च्युनर घेतली म्हणून यात काय वावगे झाले? असं म्हणत त्यांचं समर्थन केलं आहे. तर अनेकांनी डख हे पृथ्वीवरचे इंद्रदेव आहेत आणि आता त्यांनी ढगात बाण मारून फॉर्च्युनर घेतल्याचे म्हणतं त्यांचा चिमटा काढला आहे.
खरतर, डख यांनी पैसे घेऊन हवामान अंदाज सांगितला याबाबत कुणाकडे कोणताच ठोस पुरावा नाही. तसेच त्यांनी खरंच फॉर्च्युनर गाडी घेतली आहे का? याबाबत देखील कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. मात्र, या आरोप-प्रत्यारोपात सध्या व्हाट्सअप, इन्स्टाग्राम, युट्युब आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये डख यांचे नाव चर्चेत आले आहे.
विशेष म्हणजे वृत्तपत्रांमध्ये देखील डख यांचे नाव अलीकडे झळकु लागले आहे. एकंदरीत डख यांच्यावर राज्यातील लाखो शेतकरी विश्वास ठेवतात. यामुळे त्यांच्यावर जें काही आरोप लावले जात आहेत त्यावर त्यांना स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.