Panjabrao Dakh 2023 Havaman Andaj : राज्यात गेल्या जुलै महिन्यात सरासरी पेक्षा 17 टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या महिन्यात राज्यातील कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर खूपच जोराचा पाऊस आला. अनेक ठिकाणी तर अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली.
अतिवृष्टीमुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आणि शेती पिकांना मोठा फटका बसला. मात्र काही भागातील पिकांना यामुळे जीवदान मिळाले. अशातच गेल्या दहा ते बारा दिवसांपासून राज्यातून पावसाने काढता पाय घेतला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा खरीप हंगामातील पिके संकटात आली आहेत. राज्यातील अनेक भागातील पिके करपण्याचा धोका आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. पंजाबरावांनी येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
पंजाबरावांनी आजपासून 13 ऑगस्टपर्यंत राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच 15 ऑगस्ट नंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. 16 ऑगस्ट पासून राज्यातील पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
तसेच यानंतर राज्यातील इतरही भागात पावसाचा जोर हळूहळू वाढत जाणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. 22 ते 23 ऑगस्ट पासून राज्यात सर्व दूर जोरदार पाऊस पडू शकतो असं त्यांनी यावेळी सांगितले आहे. राज्यात जवळपास 30 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता राहणार असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमीच राहणार असल्याचा अंदाज आहे.