Panjabrao Dakh News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये गारठ्याचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये किमान तापमान कमी झाले असल्याने आता गारठा कमी भासू लागला आहे. अशातच महाराष्ट्रातील हवामानातं पुन्हा एकदा मोठा चेंज आला आहे.
भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागासह आता ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. खरंतर आधीच कमी पावसामुळे रब्बी हंगामातील पीक लागवडीवर विपरीत परिणाम झाला आहे.
पाऊसमान कमी झाला असल्याने हरभरा आणि गहू लागवडी खालील क्षेत्र कमी झाले आहे. अशातच आता रब्बी पिके वाढीच्या अवस्थेत असताना अवकाळी पाऊस बरसणार असे बोलले जात आहे.
जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 3 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान ढगाळ हवामानाची आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे.
कुठं बरसणार पाऊस
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 3 जानेवारी ते नऊ जानेवारी दरम्यान अर्थातच आगामी सात दिवस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या कालावधीत मोठा पाऊस पडणार नाही मात्र तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, अगदी रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपल्या शेती पिकांचे योग्य पद्धतीने नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तथापि या कालावधीमध्ये विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात घाटाच्या खाली तसेच अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.याशिवाय उत्तर महाराष्ट्रातही या कालावधीमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव व आजूबाजूच्या परिसरात या कालावधीत पाऊस हजेरी लावणार असे मत पंजाबराव यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे.