Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल होत आहे. वातावरणात सातत्याने चेंजेस येत आहेत. गेल्या महिन्यात राज्यात मुसळधार अवकाळी पाऊस झाला होता.
या चालू महिन्यातील पहिल्या आठवड्यातही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तदनंतर मात्र राज्यातील हवामान पुन्हा एकदा पूर्व पदावर आले आहे.
आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात गारठा वाढू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या काही भागात किमान तापमान 11 ते 12 अंशावर आले आहे. विदर्भातही बहुतांशी जिल्ह्यात किमान तापमान हे 14 अंशाच्या आसपास पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे येत्या काही दिवसात राज्यातील ज्या भागात अजून फारसा थंडीचा जोर वाढलेला नाही तिथे देखील थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात आता 30 डिसेंबर पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. तसेच उत्तरेकडून महाराष्ट्रात जोरदार वारे वाहत असल्याने कडाक्याची थंडी देखील पडणार असा अंदाज आहे.
आता महाराष्ट्रात थंडीची लाट येणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. राज्यात आता जोरदार थंडी पडणार असून दिवसा सुद्धा थंडी वाजेल असे सांगितले जात आहे. राज्यात आता जवळपास पुढील नऊ ते दहा दिवस हवामान कोरडे राहील आणि थंडीची लाट येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांच्या वाढीसाठी पोषक हवामान तयार होईल असे चित्र आहे. मात्र डिसेंबर महिना उलटल्यानंतर पुन्हा एकदा हवामानात चेंज येणार आहे. जानेवारी 2024 मध्ये पुन्हा अवकाळी पाऊस बरसेल असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.
यामुळे नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच होईल असे चित्र तयार होणार आहे. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे.