Petrol Diesel Price : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपूर्वी गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
याशिवाय उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात देखील शंभर रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच खाद्य तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.
एवढेच नाही तर वाढत्या महागाईमुळे बेजार झालेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून भारत ब्रँड अंतर्गत स्वस्तात पीठ, तांदूळ आणि डाळ उपलब्ध करून दिली जात आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये केंद्रातील मोदी सरकार आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करणार असे वृत्त वेगाने व्हायरल होत आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असल्याने देशातील तेल कंपन्यांना मोठा फायदा होत असेल. डिसेंबर मध्ये कच्च्या तेलाच्या किमती 75 ते 77 डॉलर प्रति बॅरल यादरम्यान नमूद करण्यात आल्या आहेत.
अशा परिस्थितीत तेल कंपन्यांना मोठा फायदा होत असून कच्च्या तेलाच्या कमी किमतीचा फायदा सर्वसामान्यांना देखील मिळावा यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या जाऊ शकतात असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये केला जात आहे.
विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून तेल कंपन्यांची चर्चा सुरू असल्याचे देखील वृत्त गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. त्यामुळे खरंच सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत विचार करत आहे का हा मोठा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे.
दरम्यान याच संदर्भात सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकारकडून पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल आहे. पुरी यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारी तेल कंपन्यां आणि सरकारमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत कोणत्याचं चर्चा सुरू नाही येत.
सध्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील या बातम्यांना कोणतेच तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. अशा कोणत्याच मुद्द्यावर सरकार आणि तेल कंपन्यांमध्ये चर्चा सुरू नाहीये. खरे तर सध्या जागतिक नकाशावरील दोन भागात तीव्र संघर्ष सुरू आहे.
त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर आहेत. यामुळे सरकारकडून इंधनाच्या किमती कमी करण्याचा कोणताचं विचार सुरू नसल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले आहे. इंधनाच्या दरात कपात होणार अशा आशयाचे वृत्त दिशाभूल करणारे असल्याचेही पुरी यांनी स्पष्ट केले आहे.
एकंदरीत सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करणार आणि दिलासा मिळणार अशी भोळी भाबडी आशा सामान्यांना होती मात्र सर्वसामान्यांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे.