PF Account:- आपल्यापैकी बरेच जण खाजगी कंपन्यांमध्ये काम करत असतात. अशावेळी अशा कंपन्यांमध्ये काम करत असताना कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच भविष्य निर्वाह निधीपोटी काही रक्कम दर महिन्याला कापली जाते व ती कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा होत असते.
आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो ती कंपनी पगारातून ठराविक रक्कम कापते व दर महिन्याला पीएफचे पैसे खात्यात जमा करते. यामध्ये आपल्या पगारातून जितकी रक्कम कापली जाते तितकीच रक्कम तुमची कंपनी देखील जमा करते. या एकूण जमा रकमेवर वार्षिक व्याजाचा लाभ मिळत असतो.
यामध्ये पीएफ खात्यात जी रक्कम जमा केली जाते ते कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 12% इतकी असते. म्हणजेच कंपनी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये 12 टक्के योगदान जमा करते. कंपनीचे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जे काही योगदान असते
त्यापैकी 3.67% रक्कम ईपीएफ खात्यात जमा होते तर पेन्शन योजनेत साधारणपणे 8.33% पैसे जमा केले जातात.परंतु पीएफ खात्यामध्ये कंपनी पैसे जमा करत आहे की नाही हे आपल्याला माहीत असणे तितकेच गरजेचे असते. हे जर तुम्हाला माहित करून घ्यायचे असेल तर खालील पद्धत अवलंबणे फायद्याचे ठरते.
तुमच्या पीएफ खात्यात पैसे जमा होत आहेत की नाही हे अशा पद्धतीने कळेल
तुमच्या प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खात्यामध्ये किती पैसे जमा झाले आहेत हे तुम्हाला प्रामुख्याने एसएमएसच्या माध्यमातून माहिती मिळत असते किंवा काही मार्गाने तुम्हाला चेक करावे लागते. यासाठी तुम्ही पासबुक तपासू शकतात. तुम्ही ईपीएफ खात्याचे पासबुक तपासले तर यामध्ये किती पैसे कधी आणि किती जमा झाले याचं संपूर्ण डिटेल तुमच्या पासबुकमध्ये असते. हे पासबुक तुम्ही ईपीएफओ पोर्टलला भेट देऊन तपासू शकतात.
ईपीएफओ पोर्टलवर पासबुक अशा पद्धतीने तपासा
1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला ईपीएफओ पोर्टल https://www.epfindia.gov.in जावे लागते व त्यासाठी तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच युएएन नंबर सक्रिय असणे गरजेचे आहे.
2- ही साईट उघडल्यानंतर त्या ठिकाणी अवर सर्विसेस या टॅब वर जावे आणि नंतर कर्मचाऱ्यांसाठी ड्रॉप डाऊन मेनू निवडा.
3- त्याखाली दिलेल्या मेंबर पासबुक वर क्लिक करावे.
4- त्यानंतर त्याच्या पुढच्या पेजवर तुम्हाला युएएन आणि पासवर्ड टाकावा लागेल व कॅपच्या कोड टाकून लॉगिन करावे.
5- लॉग इन केल्यानंतर मेंबर आयडी टाकावा व त्यानंतर तुमची ईपीएफ शिल्लक दिसते. या शिल्लक सोबत तुम्हाला सर्व ठेवींचा तपशील तसेच आस्थापना आयडी, सदस्य आयडी तसेच कार्यालयाचे नाव व कर्मचारी हिस्सा आणि नियोक्ता म्हणजेच तुमच्या कंपनीचा तुमच्या खात्यात जमा केलेला रकमेचा हिस्सा इत्यादी सगळी माहिती मिळते.
अशा पद्धतीने तुमची कंपनी तुमच्या पीएफ खात्यात पैसे जमा करत आहे की नाही हे तुम्हाला कळु शकते.