Pik Vima Maharashtra : शिंदे सरकारने मार्च महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजनेची घोषणा केली. त्यानंतर बराच काळ उलटला मात्र योजनेचा शासन निर्णय काही जारी होत नव्हता.
त्यामुळे एक रुपयात पिक विमा योजना यंदाच्या खरीप हंगामापासून लागू होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. मात्र, शिंदे सरकारने नुकताच या योजनेचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. यानुसार यंदाच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान पीक विम्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेअंतर्गत किती पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे तसेच त्यासाठी कुठे अर्ज करावा लागणार याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पिकांना मिळणार विमा संरक्षण
मिळालेल्या माहितीनुसार, एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामामध्ये तब्बल 14 प्रकारच्या पिकांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. या 14 पिकांसाठी विमा काढताना शेतकऱ्यांना मात्र एक रुपया भरावा लागणार आहे शेतकऱ्यांच्या हिश्याची उर्वरित रक्कम ही राज्य शासन भरणार आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा या खरिपातील पिकांसाठी विमा संरक्षण एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.
अर्ज कुठे सादर करावा लागणार
राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामापासून पिक विमा योजनेचा लाभ देण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. आता या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून पिक विम्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी पिक विम्यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन देखील यावेळी केले आहे. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पीकविमा संरक्षण मिळण्यासाठी ३१ जुलै पर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी या मुदतीपूर्वी संबंधित बँक, http://pmfby.gov.in व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज सादर करायचा आहे.
कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज देणे आवश्यक आहे. कर्जदार योजनेत सहभागी होण्यास इच्छुक नसल्यास तसे विहित मुदतीत बँकेला लेखी कळविणे देखील आवश्यक आहे.