Pm Surya Ghar Mofat Vij Yojana : लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सरकारने देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची योजना सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला म्हणजेच श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी पीएम सूर्योदय योजनेची घोषणा केली होती.
या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळावी यासाठी सोलर पॅनल बसवण्याकरिता अनुदान दिले जाणार होते. पुढे या योजनेची घोषणा केंद्राच्या अर्थसंकल्पात झाली.
त्यावेळी या योजनेला पीएम सुर्यघर मोफत वीज योजना असे नाव देण्यात आले. यानंतर या योजनेचा जीआर जारी झाला. या योजनेसाठी एक पोर्टल तयार करण्यात आले आणि योजनेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले गेलेत.
अजूनही या योजनेसाठी अर्ज करणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. या अंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांना तब्बल 78,000 पर्यंतचे अनुदान मिळणार आहे.
पण, अनेकांच्या माध्यमातून या योजनेबाबत अजूनही काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही लोकांनी या योजनेचा भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांनाही फायदा मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार ?
पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत कमाल 78 हजाराचे अनुदान मिळणार आहे. हे अनुदान सोलर पॅनलचा क्षमतेनुसार राहणार आहे. एक किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 60,000 रुपये आणि तीन किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना याचा लाभ मिळणार का ?
या योजनेचा लाभ हा वीज कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे. तसेच याचा लाभ हा स्वतःचे घर असणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे. म्हणजेच भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. विशेष बाब म्हणजे जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांना देखील याचा लाभ मिळणार नाही.
कारण की, सोलर पॅनल बसवण्यासाठी छतावर जागा असणे आवश्यक राहणार आहे. एकंदरीत ज्या व्यक्तीच्या नावावर वीज कनेक्शन आहे आणि त्याच्याकडे स्वतःचे घर आहे त्यांनाचं याचा लाभ मिळू शकणार आहे.