PMRDA Metro News : राज्यात पुणे, मुंबई आणि नागपूर या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याबाबत बोलायचं झालं तर सध्या स्थितीला पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. विशेष म्हणजे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत मेट्रो मार्गाचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.
हे मेट्रो मार्ग महामेट्रोकडून विकसित होत आहेत. विशेष म्हणजे 11 मार्च 2024 ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित मेट्रो मार्ग प्रकल्पाला देखील मंजुरी मिळालेली आहे.
हे दोन्ही विस्तारित मेट्रो मार्ग महा मेट्रोकडून उभारण्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. अशातच, आता पुणेरी मेट्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणेरी मेट्रो मार्ग प्रकल्पासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
खरे तर पीएमआरडीए हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो मार्ग तयार करत आहे. हे काम सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर अर्थातच पीपीपी तत्त्वावर सुरू आहे.
या मेट्रो मार्ग प्रकल्पाची उभारणी टाटा समूहासोबत केली जात आहे. विशेष म्हणजे पीएमआरडीएच्या या मेट्रो मार्गाचा आता विस्तार होणार आहे. शिवाजीनगर ते लोणी काळभोर पर्यंत हा मेट्रो मार्ग विस्तारित केला जाणार आहे.
हा विस्तारित मेट्रो मार्ग देखील पीपीपी तत्त्वावर होणार आहे. याबाबतचा प्रकल्प व्यवहार्यता अहवाल पीएमआरडीएने स्थापित केलेल्या सल्लागार संस्थेकडून पीएमआरडीएला सादर झाला आहे.
सल्लागार संस्थेचा अहवाल सकारात्मक
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, PMRDA च्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचा विस्तार करण्यासाठी प्रकल्प विकास आराखडा तयार करण्यात आला होता. यानुसार, शिवाजीनगर ते लोणी काळभोर असा विस्तारित मेट्रो मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आहे.
एवढेच नाही तर हडपसर ते सासवड रस्ता आणि रेस कोर्स ते स्वारगेट हा मेट्रो मार्गही प्रस्तावित करण्यात आला आहे. हे मेट्रो मार्ग एकूण 23 किलोमीटर लांबीचे राहणार आहेत. दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या मार्गांची व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती केली होती.
आता याच संस्थेने या प्रकल्पाबाबतचा व्यवहार्यता अहवाल पीएमआरडीएकडे सादर केला आहे. या अहवालात हा मार्ग पीपीपी तत्त्वावर म्हणजेच सार्वजनिक खाजगी तत्त्वावर करता येणे शक्य असल्याचे म्हटले गेले आहे.
यामुळे आता हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचा शिवाजीनगर ते लोणी काळभोर पर्यंत विस्तार होईल अशी आशा आहे. परिणामी आता भविष्यात पुणेकरांना लोणी काळभोर पर्यंत मेट्रोने प्रवास करता येणे शक्य होणार आहे.