Property Rights : संपत्तीच्या कारणावरून आपल्या देशात नेहमीच वादविवाद पाहायला मिळतात. अनेकांकडून संपत्तीबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. दरम्यान, सासऱ्याच्या संपत्तीत जावयाचा किती अधिकार असतो असा देखील प्रश्न काही लोकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
अशा परिस्थितीत, आज आपण सासऱ्याच्या संपत्तीत जावयाला खरंच अधिकार मिळतो का ? याबाबत कोर्टाने काय स्पष्टीकरण दिले आहे याविषयी महत्त्वाची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर भारतीय कायद्याने मुलीला तिच्या आई-वडिलांच्या संपत्तीत तिच्या भावंडांप्रमाणेच समान अधिकार दिलेला आहे. विशेष बाब म्हणजे मुलीचे लग्न झालेले असले तरीही तिला आई-वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळणार आहे.
अशा परिस्थितीत, अनेकांकडून जर मुलीला अधिकार मिळतो तर जावयाला देखील त्याच्या सासू-सासऱ्याच्या संपत्तीत अधिकार मिळतो का असा प्रश्न उपस्थित होत होता. याबाबत केरळ उच्च न्यायालयात देखील एक प्रकरण आले होते.
उच्च न्यायालयात आलेल्या या प्रकरणात जावयाने त्याच्या सासऱ्याच्या संपत्तीवर अधिकार मागितला होता. डेव्हिस नामक व्यक्तीने त्याच्या सासऱ्याच्या हेन्ड्री थॉमस यांच्या मालमत्तेवर हक्क सांगितला होता. यासाठी त्याने केरळ हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
पण या आधी त्याच्या सासर्याने म्हणजे हेन्ड्री थॉमसने पयन्नूर येथील कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल केला होता. डेव्हिसला त्याच्या मालमत्तेत ढवळाढवळ करण्यापासून कायमचे रोखण्यासाठी आणि त्याला त्याच्या मालमत्तेचा आणि घराचा शांतपणे उपभोग घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती हेन्ड्रीने न्यायालयाला केली होती.
फादर जेम्स नाझरेथ आणि सेंट पॉल चर्च यांच्याकडून ही मालमत्ता भेट म्हणून मिळाल्याचा दावा हेन्ड्रीने केला होता. यावर त्यांनी स्वत:च्या पैशातून कायमस्वरूपी घर बांधले असून तेथे कुटुंबासह राहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या मालमत्तेवर आपल्या जावयाचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. यावर, जावई डेव्हिस यांनी असा युक्तिवाद केला की मालमत्तेची मालकी स्वतःच प्रश्नात आहे, कारण ती चर्च अधिकाऱ्यांनी देणगीच्या डीडद्वारे कुटुंबाला दिली होती.
हेंड्री यांच्या एकुलत्या एक मुलीशी त्याचे लग्न झाले आहे आणि लग्नानंतर त्याला एकाप्रकारे कुटुंबाने दत्तक घेतले आहे. त्यामुळे त्याला या घरात आणि मालमत्तेत राहण्याचा अधिकार आहे.
या सर्व युक्तिवादानंतरही कनिष्ठ न्यायालयाने आपल्या निर्णयात डेव्हिसचा हेंड्रीच्या मालमत्तेवर अधिकार नसल्याचे म्हटले होते. म्हणजेच जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीवर अधिकार नसल्याचे माननीय कोर्टाने स्पष्ट केले आहे.