Property Rights Marathi : भारतीय संस्कृतीत काळानुरूप बदल पाहायला मिळत आहे. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती आपल्या देशात अधिक पाहायला मिळायची. पण आता हळूहळू विभक्त कुटुंब पद्धतीने आपल्या देशात पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता सख्खी भावंडे पक्की वैरी होऊ लागली आहेत. सख्खे भाऊ आता जमिनीवरून भांडताना पाहायला मिळत आहेत.
अनेकदा संपत्तीवरून असणारा परिवारातील वाद सामंजस्याने मिटत नाही मग नाईलाजाने अनेकांना कोर्टाच्या पायऱ्या देखील चढाव्या लागत आहेत. मात्र अनेकांना संपत्तीच्या हक्काबाबत अपेक्षित माहिती नसते. यामुळे त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. पण जर संपत्तीच्या हक्काबाबत आणि या संदर्भातील कायद्याबाबत यथायोग्य माहिती असेल तर नागरिकांना आपल्या हक्कासाठी योग्य ठिकाणी आवाज उचलता येतो.
अशा परिस्थितीत आज आपण मालमत्तेच्या हक्कातील एका महत्त्वाच्या बाबीसंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण आजोबांच्या संपत्तीत नातवाचा किंवा नातीचा किती अधिकार असतो? तसेच आजोबाच्या नावे असलेल्या कोणत्या संपत्तीत नातवाला किंवा नातीला हिस्सा मिळत नाही याविषयी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आजोबाच्या संपत्तीत नातवाचा अधिकार असतो का?
खरंतर वडिलोपार्जित संपत्ती मध्ये आजोबा, वडील आणि भावंडांचा अधिकार असतो. वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे अशी संपत्ती जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झाली आहे. अशा संपत्तीमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा हक्क असतो. भारतीय कायद्यानुसार हिंदू कुटुंबात जन्माला आलेल्या मुलांना आणि मुलींना जन्मापासूनच वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार राहतो.
याचाच अर्थ आजोबांच्या नावे असलेल्या वडिलोपार्जित संपत्तीत वारस म्हणून वडिलांना तसेच भावंडांना अधिकार राहतो. वडीलोपार्जित संपत्तीत कुटुंबातील सर्व सदस्यांना समान अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे आजोबांच्या नावे असलेल्या वडिलोपार्जित संपत्तीत जर नातवांना अधिकार मिळत नसेल तर ते कायद्याने हा अधिकार मिळवू शकतात.
आजोबांच्या कोणत्या संपत्तीत अधिकार नसतो?
संपत्तीचे दोन प्रकार पडतात वडिलोपार्जित आणि स्वअर्जित. स्वअर्जित संपत्ती म्हणजे अशी संपत्ती जी एखादा व्यक्ती स्वतः खरेदी करतो किंवा कमावतो. भारतीय कायद्यानुसार जर आजोबांनी स्वतः कमावलेली स्वअर्जित संपत्ती असेल तर अशा संपत्तीवर फक्त आणि फक्त आजोबांचा अधिकार राहतो.
अशी संपत्ती आजोबा आपल्या मुलांना किंवा नातवंडांना देऊ शकतात अथवा देऊही शकत नाही.म्हणजेच आजोबा अशी संपत्ती कोणाच्याही परवानगी विना कोणालाही देऊ शकतात किंवा अशी संपत्ती आजोबा कोणाच्या पूर्वपरवानगीशिवाय विकूही शकतात.
जर आजोबांनी आपल्या मृत्यूपूर्वी इच्छापत्र तयार केले असेल आणि त्या इच्छा पत्रात सदर स्वअर्जित संपत्ती परिवारातील एखाद्या सदस्याच्या नावे केली असेल तर ती संपत्ती त्याला मिळू शकते. मात्र जर आजोबा इच्छा पत्र तयार न करता मरण पावलेत आणि त्यांच्या नावावर स्व अर्जित संपत्ती असेल तर ती संपत्ती त्यांच्या मुलांच्या आणि मुलींच्या नावावर होते. अशा संपत्तीत त्यांच्या मुला-मुलींना समान अधिकार राहतो.