Property Rights Son : भारत देशाची अर्थव्यवस्था ही वेगाने विकसित होत आहे. जगात भारताची अर्थव्यवस्था ही पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बदल असा विश्वास अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र आजही भारतात रुढीवादी परंपरा कायम आहेत.
पुरुषप्रधान संस्कृतीचे वेळोवेळी दर्शन होत असते. यामुळे विकसनशील देशाच्या यादीतून उठून विकसित होण्याच्या मार्गावर असलेल्या भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीत बदल होणे खूपच आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून देखील प्रयत्न केले जात आहेत.
शासनाकडून महिलांना विविध क्षेत्रात चांगले काम करता यावे यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. महिलांसाठी शासनाने वेगवेगळे नियम बनवले आहेत, कायदे बनवले आहेत. महिलांसाठी विशेष योजना चालवल्या जात आहेत. महिलांना प्रत्येक क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी अनुकूल वातावरण तयार केले जात आहे.
असे असतानाही मात्र आपल्या समाजात आजही जेव्हा मालमत्तेचा विषय निघतो तेव्हा सर्वप्रथम मुलांना प्राधान्य दिले जाते. मालमत्तेची वाटाघाटी होते तेव्हा सर्वप्रथम मुलांना हिस्सा मिळतो. अनेकदा तर मुलींना त्यांचा हिस्सा दिला जात नाही.
अशा परिस्थितीत लग्नानंतर मुलींना त्यांच्या आई वडिलांच्या संपत्तीत किती अधिकार मिळतो ? हा प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. अशा परिस्थितीत आज आपण लग्नानंतर मुलींचे आई-वडिलांच्या संपत्तीतील अधिकार, याबाबत भारतीय कायद्यात असलेली तरतूद अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय सांगतो कायदा
खरे तर भारतीय कायद्यानुसार मुलांना आणि मुलींना आई वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार देण्यात आला आहे. पण विवाहित मुलीला लग्नानंतर तिच्या आई वडिलांच्या संपत्तीत किती वाटा मिळतो याबाबत अनेकांना अजूनही फारशी माहिती नसल्याचे आढळून आले आहे.
यामुळे अनेक जण विवाहित मुलगी तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर मालकी हक्क सांगू शकते का ? असा प्रश्न उपस्थित करत होते. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विवाहित महिला तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकते.
2005 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 मध्ये सुधारणा केल्यानंतर, कन्येला सह-वारस म्हणजेच समान वारस म्हणून गणले गेले. आता मुलीच्या लग्नामुळे वडिलांच्या मालमत्तेवरचा तिचा अधिकार बदलत नाही. म्हणजेच लग्नानंतरही वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क असतो. यानुसार वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा जितका अधिकार आहे तितकाच हक्क मुलीचा आहे.
मुलगी अविवाहित असली तरी आणि मुलगी विवाहित असली तरी मुलांप्रमाणेच मुलींनाही आई-वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार देण्याचे प्रावधान भारतीय कायद्यात आहे. मात्र असे असले तरी जर वडिलांनी आपल्या नावे असलेली संपत्ती मरणापूर्वी मुलाच्या नावे केली तर मुलीला अशा संपत्तीत दावा सांगता येत नाही.
एवढेच नाही तर वडिलांनी जर स्वतःच्या कष्टाने कमावलेली संपत्ती असेल तर अशा संपत्तीत देखील मुलींना दावा सांगता येत नाही. अशा स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीवर मुलांना देखील दावा सांगता येत नाही अशी संपत्ती आई वडील कोणालाही दान करू शकतात किंवा कोणालाही देऊ शकतात.