Property Rights : आपल्या देशात संपत्ती वरून खूपच वाद विवाद पाहायला मिळतात. नागरिकांना मालमत्तेवरील हक्क आणि दाव्यांच्या नियमांची कायदेशीर समज, ज्ञान नसते, यामुळे वादविवाद होण्याची शक्यता निर्माण होते.
हेच कारण आहे की, आपल्यापैकी प्रत्येकालाच मालमत्तेशी निगडीत नियम आणि अधिकारांची योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान आज आपण संपत्ती बाबतच्या कायद्यामध्ये तरतूद असलेल्या एका महत्त्वाच्या बाबी विषयी जाणून घेणार आहोत.
आज आपण आजोबाच्या संपत्तीत नातवाला किती अधिकार मिळतो, आजोबाच्या कोणत्या संपत्तीत नातवाला अधिकार मिळत नाही? याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या महत्वपूर्ण माहिती विषयी सविस्तर.
काय सांगतो कायदा
जर आजोबांकडे स्वतः कमावलेली संपत्ती असेल म्हणजे स्वअर्जित संपत्ती असेल तर अशा संपत्तीवर नातवाचा अधिकार नसतो. आजोबा त्यांनी कमावलेली संपत्ती कोणालाही देऊ शकतात.
आजोबा इच्छापत्र बनवून त्यांनी कमावलेली संपत्ती कोणत्याही व्यक्तीला देऊ शकता. पण, जर आजोबा मृत्युपत्र न बनवता मरण पावले, तर त्यांची मालमत्ता पत्नी, मुलगा आणि मुलगी यांसारख्या त्यांच्या तात्काळ किंवा प्रथम प्राधान्य कायदेशीर वारसांकडे जाईल.
म्हणजे मृत्युपत्र न बनवता आजोबाचा मृत्यू झाला तर आजोबाची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचा त्या मालमत्तेवर कायदेशीर अधिकार राहणार आहे.
म्हणजे नातवाचा त्याच्या आजोबाच्या संपत्तीवर अधिकार नसतो परंतु त्याच्या वडिलांचा आजोबाच्या संपत्तीवर अधिकार असतो.
जोपर्यंत वडील हयात असतील तोवर आजोबांच्या मालमत्तेवर तो कोणताही हिस्सा दावा करू शकत नाही. दुसरीकडे, वडिलोपार्जित मालमत्तेवर नातवाचा कायदेशीर हक्क असतो.
याबाबत कोणताही वाद झाल्यास नातू दिवाणी न्यायालयात जाऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीवर नातवाचा त्याच्या आजूबाप्रमाणेच आणि वडिलांप्रमाणेच अधिकार असतो.
एकंदरीत आजोबाने स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीत नातवाला अधिकार नसतो. दुसरीकडे वडीलोपार्जित संपत्तीत नातवाला पूर्ण अधिकार असतात.