Pune Ahmednagar Railway News : पुणे आणि अहमदनगर ही मध्य महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे आहेत. पुण्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त आहे. दुसरीकडे अहमदनगर हा उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा असून पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून या जिल्ह्याला ओळखले जाते.
पुणे ते अहमदनगर यादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी मागणी देखील आहे. रेल्वे प्रवाशांची ही मागणी फार जुनी आहे.
पण आतापर्यंत हे दोन्ही रेल्वे स्थानक वेगवेगळ्या विभागात येत होते. अहमदनगर रेल्वे स्थानक सोलापूर विभागात येत असे आणि पुणे रेल्वे स्थानक पुणे विभागात होते. मात्र, आता अहमदनगर रेल्वे स्थानक पुणे विभागात आले आहे.
त्यामुळे या दोन्ही शहरादरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरू होऊ शकते अशी आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाली आहे. अशातच मात्र पुण्याकडे प्रवास करणाऱ्या अहमदनगर मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे आगामी होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने या मार्गावर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते मुझफ्फरपूर दरम्यान नवीन विशेष सुपरफास्ट एसी गाडी चालवण्याचा निर्णय सेंट्रल रेल्वेने घेतलेला आहे.
ही गाडी अहमदनगर मार्गे धावणार असून जिल्ह्यातील अहमदनगर, बेलापूर आणि कोपरगाव या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे.पण ही विशेष गाडी मात्र नियमित धावणार नाही.
२५ मार्च ते ८ एप्रिलदरम्यानच्या कालावधीत ही गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी या कालावधीत दर सोमवारी पुण्याहून सकाळी साडेसहा वाजता सुटणार आहे आणि मुझफ्फरपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वा तीन वाजता पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात ही सुपर फास्ट एसी विशेष गाडी २३ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान चालवली जाणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी दर शनिवारी मुझफ्फरपूर येथून रात्री सव्वा अकरा वाजता सुटेल आणि पुण्याला सोमवारी सकाळी ५.३५ वाजता पोहोचणार आहे.
विशेष गाडी कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
मिळालेल्या माहितीनुसार ही विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलिपुत्र आणि हाजीपूर या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.