Pune Breaking News : येत्या वर्षात अर्थातच 2024 मध्ये लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. याशिवाय महाराष्ट्रासहित देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीचा हंगाम पाहता आतापासूनच सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजताना पाहायला मिळत आहेत.
देशातील अनेक प्रमुख पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देखील सर्वसामान्य जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून नुकत्याच काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्या आहेत.
उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने महिलांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय वाढती महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत.
तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या पक्षांतील राजकीय नेते विविध राज्यांमध्ये दौरे देखील करत आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांसाठी मेट्रोच्या दोन मार्गांचे उदघाट्न केले होते.
अशातच आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान पुणेकरांना एक विशेष भेट देखील मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5 ऑक्टोबर रोजी मोदी यांचा पुणे दौरा नियोजित करण्यात आला आहे. यावेळी पुणे शहरातील लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनलचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
खरंतर, लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम नुकत्याच काही दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात झाले आहे. यामुळे हे नवीन टर्मिनल केव्हा सुरू होणार ? असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित होत होता. पण आता हे नवीन टर्मिनल 5 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमान प्रवाशांसाठी सुरू केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या नवीन टर्मिनलची चाचणी यशस्वीरित्या पार पडली असून पुढल्या महिन्यापासून हे टर्मिनल आता वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याचे निश्चित झाले आहे.