Pune Metro News : पुणे शहरात 2022 मध्ये मेट्रो प्रत्यक्षात धावू लागली. यानंतर एक ऑगस्ट 2023 ला वनाज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक आणि पिंपरी स्थानक ते सिविल कोर्ट स्थानक हे दोन विस्तारित मेट्रो मार्ग सुरु करण्यात आले. विस्तारित मेट्रो मार्ग सुरू होण्यापूर्वी पुणेकरांनी मेट्रोला फारशी पसंती दाखवलेली नव्हती.
परंतु जेव्हापासून हे विस्तारित मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत तेव्हापासून प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर मेट्रो चालवली जाणार आहे.
आता मेट्रोचा विस्तार थेट लोणी काळभोर पर्यंत होणार आहे. हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड या दोन मार्गावर मेट्रो चालवली जाणार आहे. याचा सविस्तर प्रकल्प आराखडा म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, डीपीआर देखील तयार झाला आहे.
हा डीपीआर महा मेट्रोच्या माध्यमातून तयार करण्यात आला असून या नुसार हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड या दोन मेट्रो मार्गांचे 17 किलोमीटर एवढे अंतर राहणार आहे. या प्रकल्पासाठी 4,757 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान आता हा डीपीआर पुणे महापालिकेकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की महा मेट्रो कडून पुणे शहरात पहिल्या टप्प्यात 32 किलोमीटर अंतरावर मेट्रो विकसित केली जात आहे, तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या 23 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. एवढेच नाही तर दुसऱ्या टप्प्यातील 44.7 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
यात स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गाचा समावेश आहे. या दुसऱ्या टप्प्यातील जवळपास 45 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाला महापालिकेच्या स्थायी समितीने आणि मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव केंद्र आणि राज्य शासनाकडे मंजुरीसाठी गेला आहे.
याशिवाय पी एम आर डी कडून शिवाजीनगर ते हडपसर या दरम्यान मेट्रो चालवण्याचे नियोजन आखले जात आहे. अशातच आता दुसऱ्या टप्प्यात हडपसर ते लोणी काळभोर 11.35 किलोमीटर आणि हडपसर ते सासवड 5.57 किलोमीटर लांबी असलेल्या मेट्रो मार्गाचा डीपीआर महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे.
या प्रस्तावाला आता पालिकेच्या स्थायी समितीकडून आणि मुख्य सभे कडून मंजुरी म्हणजे मान्यता घेतली जाणार आहे. यानंतर मग हा प्रस्ताव राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. दरम्यान आता आपण या मार्गावर कोणकोणती स्थानके राहणार याविषयी जाणून घेऊया.
हडपसर ते लोणी काळभोर या साडेअकरा किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गात हडपसर, हडपसर फाटा, हडपसर बस डेपो, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, स्टड फार्म, मांजरी फाटा, द्राक्ष बाग, टोलनाका, वाकवस्ती, लोणी काळभोर अशी 11स्थानके राहणार आहेत. तसेच हडपसर ते सासवड या मार्गावर एव्हिएशन ग्राउंड, फुरसुंगी आयटी पार्क, सुलभ गार्डन आणि सासवड रेल्वे स्टेशन ही स्थानके राहणार आहेत.