Pune Metro News : पुणेकरांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे शहरातील मेट्रोमार्गाबाबत आहे. पुणे शहराचा विकास गेल्या काही वर्षात झपाट्याने झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली आहे.
अशा परिस्थितीत शहरातील सध्याची वाहतूक व्यवस्था ही तोकडी सिद्ध होत आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल केला जात आहे. शहरात दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. यासोबतच शहरात मेट्रोची देखील कामे प्रस्तावित आहेत.
दरम्यान आता विस्तारित मेट्रोमार्गाबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विस्तारित मेट्रो मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सध्या या विस्तारित मेट्रो मार्गाची तपासणी सुरु असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पार पाडले जात आहे.
तपासणीचे हे काम येत्या आठवड्यात पूर्ण होईल आणि त्यानंतर आयुक्त या मार्गावर रेल्वे चालवण्यास परवानगी देतील असा आशावाद व्यक्त होत आहे. आयुक्तांची ही परवानगी मिळाली की लगेचच या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल असे सांगितले जात आहे.
केव्हा उद्घाटन होणार ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या पुणे शहरात दोन मार्गावर मेट्रो सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक या दोन मार्गावर सध्या मेट्रो सुरू आहे. 2022 मध्ये या मार्गावरील मेट्रोच्या सेवेला सुरुवात झाली आहे. दरम्यान आता या मार्गाच्या विस्तारित मेट्रो मार्गांचे देखील काम पूर्ण झाले आहे.
गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल स्थानक असे ५.१२ किलोमीटर लांबीच्या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच आठ किलोमीटर लांबीचे फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय दरम्यानचे विस्तारित मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. अर्थातच 13 किलोमीटर लांबीचे विस्तारित मेट्रो मार्ग पूर्ण झाले असून सध्या या मार्गांची तपासणी सुरू आहे.
ही तपासणी आता या आठवड्या अखेर पूर्ण होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक ऑगस्टला या विस्तारित मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. महामेट्रोतील सूत्रांनी एका खाजगी वृत्तसंस्थेला पीएम मोदी या विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार असे सांगितले आहे.