Pune Metro News : काल लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा पर्व सुरू झाला आहे. हा आनंददायी पर्व 28 सप्टेंबर अर्थातच अनंत चतुर्थी पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
विविध मंडळांनी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. यामुळे मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्त गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी करणार आहेत. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता पुणे मेट्रोने एक अतिशय महत्त्वाचा आणि गणेश भक्तांसाठी सोयीचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला. त्यामुळे गणेश भक्तांचा रात्रीचा प्रवास सुरक्षित आणि सोयीचा होणार आहे. पुणेकरांना गणेशोत्सवाच्या काळात रात्री देखील मेट्रो उपलब्ध व्हावी यासाठी मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
या नवीन बदलानुसार आता पुणे मेट्रो प्रशासनाने मेट्रो सेवा रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 22 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान पुणे मेट्रो रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. एवढेच नाही तर गणेश विसर्जनाच्या दिवशी पहाटे दोन पर्यंत मेट्रोची सेवा सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या पुणे मेट्रो सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत चालवली जात आहे. पण गणेशोत्सवाच्या काळात 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत मेट्रो चालवली जाणार आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या काळात पीएमपीने देखील रात्रभर सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे पुण्यातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही असा आशावाद व्यक्त केला जात आहे. खरंतर, दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात रात्री पुण्यातील नागरिक देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. अशा परिस्थितीत रात्री देखावे पाहून घरी परतण्यासाठी नागरिकांना खाजगी रिक्षा किंवा कॅबने प्रवास करावा लागतो.
मात्र रात्रीच्या वेळात खाजगी वाहन चालकांकडून नागरिकांकडून अधिकचे पैसे वसूल केले जातात. यामुळे पुण्यातील नागरिकांनी मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करून गणेशोत्सवाच्या काळात मेट्रो रात्री उशिरापर्यंत चालवली पाहिजे अशी मागणी केली होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रशासनाने आता हा निर्णय घेतला आहे.