Pune Metro News : पुणे, मुंबई आणि नागपूर या प्रमुख शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे या शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान हिच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या तिन्ही शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर सध्या स्थितीला सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्यातनाम असलेल्या या शहरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रोची सेवा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे या मेट्रो सेवेला पुणेकरांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे सिविल कोर्ट ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग देखील लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. अशातच आता पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मार्गाच्या विस्तारित टप्प्याचे अर्थातच पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी पर्यंतच्या मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे.
खरेतर या मार्गाचे भूमिपूजन नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. मात्र या मार्गाचे काम अजून सुरू झालेले नव्हते. आता मात्र या मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे हा मार्ग नियोजित वेळेत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी आशा आहे. दरम्यान या मेट्रो मार्गाच्या कामासाठी शहरातील वाहतुकीत बदल केला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रोकडून या मार्गाच्या कामासाठी माती परीक्षण केले जाणार आहे. यासाठी चिंचवड ते निगडी दरम्यान 81 ठिकाणी लॉग बोअर घेतले जाणार आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. दरम्यान वाहतुकीचा हाच खोळंबा लक्षात घेता निगडी वाहतूक विभागांतर्गत वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपूल ते भक्ती शक्ती चौक निगडी परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. दरम्यान आता आपण पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामासाठी वाहतुकीत करण्यात आलेला बदल थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा राहणार वाहतुकीतील बदल
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कामामुळे भक्ती शक्ती चौकाकडून येणारी जड वाहतूक टिळक चौकाकडे न जाता भक्ती शक्ती सर्कल वरून अंकुश चौक-त्रिवेणीनगर चौक-दुर्गानगर-थरमॅक्स चौकातून वळवण्यात आली आहे.
तसेच भक्ती शक्ती चौकाकडून येणाऱ्या लक्झरी बसेस टिळक चौकाकडून खंडोबा माळ चौकाकडे न जाता त्या भेळ चौक-संभाजी चौक मार्गे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुर्गानगर चौकाकडून येणारी जड वाहतुक डावीकडून खंडोबामाळ चौकाकडे न वळवता सरळ भेळ चौक-संभाजीनगर चौकातून वळवण्याचा निर्णय झालेला आहे.
खंडोबामाळ चौकाकडून पिंपरीकडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या जड अवजड वाहतुक बंद ठेवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
टिळक चौकापासून काळभोरनगर अंडरपासपासून पुढे बीआरटीमधून वाहतुकीसाठी परवानगी दिली जाणार आहे.
भक्ती शक्ती चौकापासून ते काळभोरनगर अंडरपास पर्यंत दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन राहणार अशी माहिती समोर आली आहे.