Pune Metro : मेट्रो हा पुणेकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. दरम्यान याच मेट्रो संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाला आज हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यांनी कोलकत्ता येथे आयोजित एका कार्यक्रमातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवला आहे.
अशा परिस्थितीत आता आपण या विस्तारित मेट्रो मार्गावरील मेट्रोचे तिकीट दर आणि वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर, ऑगस्ट 2023 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गावरील मेट्रो सुरू झाली होती.
यानंतर आज रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. हा मेट्रो मार्ग साडेपाच किलोमीटर लांबीचा असून यावर चार मेट्रो स्थानके आहेत.
बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी हे चार मेट्रो स्थानके या मार्गावर विकसित झाली आहेत. सध्या स्थितीला मात्र येरवडा हे मेट्रो स्थानक वगळले गेले आहे. या स्थानकाचे काही काम अजूनही शिल्लक असल्याने हे स्थानक पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
कस राहणार वेळापत्रक ?
महामेट्रोकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत दोन्ही मार्गांवर मेट्रो सेवा सुरू राहणार आहेत. गर्दीच्या वेळेत दर 10 मिनिटांनी प्रवाशांना मेट्रो उपलब्ध असणार आहेत.
12 ते 4 या वेळेत दर 15 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असणार अशी माहिती यावेळी समोर आली आहे. या मेट्रो मार्गामुळे या भागातील प्रवाशांचा प्रवास हा आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.
कसे राहणार तिकीट दर
हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर आता या मार्गाने मेट्रो प्रवास करण्यासाठी किती टिकीट दर आकारले जाणारे याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता पुणेकरांमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान आता आपण या मार्गाचे तिकीट दर कसे राहणार हे थोडक्यात पाहणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, वनाज ते रामवाडी पर्यंतचा प्रवास करण्यासाठी 30 रुपये एवढे तिकीट दर राहणार आहे. पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट या प्रवासासाठी देखील 30 रुपये एवढे तिकीट दर ठरवण्यात आले आहेत. वनाज ते पिंपरी चिंचवड या प्रवासासाठी 35 रुपये तिकीट दर आकारले जाणार आहे.
रूबी हॉल ते पिंपरी चिंचवड या प्रवासासाठी 30 रुपये एवढे तिकीट दर आकारले जाईल. वनाज ते डेक्कन जिमखाना या प्रवासासाठी वीस रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे. तसेच, पिंपरी चिंचवड ते पुणे स्टेशन या प्रवासासाठी प्रवाशांना 30 रुपयांचे तिकीट घ्यावे लागणार आहे.
विशेष बाब म्हणजे पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिकीट दरात तीस टक्के सवलत राहणार आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी सर्वच प्रवाशांना तिकीट दरात 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय महामेट्रोने घेतलेला आहे.