Pune Metro Timetable : पुणेकरांसाठी एक ऑगस्ट रोजी दोन महत्त्वाचे मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत. पुणे शहरातील विस्तारित मेट्रो मार्ग सुरू झाले असल्याने प्रवाशांना याचा मोठा फायदा होत आहे. प्रवाशांनी देखील या मेट्रो मार्गांना भरभरून असा प्रतिसाद दाखवला आहे.
महा मेट्रोने वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिविल कोर्ट स्थानक दरम्यानच्या विस्तारित मेट्रो मार्ग सुरू केले आहेत. दरम्यान पुणेकरांच्या सोयीसाठी या विस्तारित मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या वेळापत्रकात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
मात्र वेळापत्रकात झालेला हा बदल केवळ एकाच मार्गासाठी लागू करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मेट्रो प्रशासनाच्या माध्यमातून वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक पर्यंतच्या मेट्रो मार्गाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
या मेट्रो मार्गावर आधी सकाळी सात ते रात्री 10 पर्यंत मेट्रो चालवली जात होती.
पण आता या मेट्रो मार्गावर सकाळी सहा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत मेट्रो चालवली जाणार आहे. म्हणजे सकाळी एक तास लवकर मेट्रो धावणार आहे. यामुळे या संबंधित मार्गावरील मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला जात आहे.
मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिविल कोर्ट स्थानक दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विस्तारित मेट्रोमार्गावरच्या वेळापत्रकात कोणताच बदल झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिविल कोर्ट दरम्यानची मेट्रो सकाळी सात ते रात्री 10 या वेळेतच धावणार आहे.
कसं असणार पुणे मेट्रोचे वेळापत्रक
महा मेट्रोच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक दरम्यानची मेट्रो सकाळी सहा ते आठ या वेळेत दर पंधरा मिनिटांनी धावणार आहे. यानंतर सकाळी आठ ते 11 दरम्यान ही मेट्रो दर दहा मिनिटांनी धावणार आहे.
पुन्हा 11 ते दुपारी चार पर्यंत ही मेट्रो दर पंधरा मिनिटांनी धावणार आहे. दुपारी चार ते आठ दरम्यान ही मेट्रो दर दहा मिनिटांनी धावणार आहे. शेवटच्या टप्प्यात म्हणजेच रात्री आठ ते दहा पर्यंत ही मेट्रो दर पंधरा मिनिटांनी धावणार आहे.
तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिविल कोर्ट स्थानक दरम्यानची मेट्रो सकाळी सात ते आठ या वेळेत दर पंधरा मिनिटांनी धावणार आहे. सकाळी आठ ते 11 या वेळेत दर दहा मिनिटांनी धावणार आहे.
पुन्हा सकाळी 11 ते दुपारी चार पर्यंतच्या वेळेत दर पंधरा मिनिटांनी धावणार आहे. दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत दर दहा मिनिटांनी धावणार आहे. आठ ते दहा या वेळेत दर पंधरा मिनिटांनी धावणार आहे.