Pune Nashik Expressway : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विविध महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील काही महामार्गाची कामे आता पूर्ण होण्याच्या अवस्थेत आहेत. समृद्धी महामार्ग असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाचे आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील जलद गतीने सुरू आहे. समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून आतापर्यंत नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे.
दुसरीकडे नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन देखील सुरू झाले आहे. अशातच, आता पुणे ते नाशिक दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या औद्योगिक महामार्गासाठी देखील लवकरच भूसंपादन सुरू होणार असे वृत्त हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या या 213 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
विशेष म्हणजे या महामार्गासाठी लागणारी जमिन अधिग्रहित करण्यासाठीची अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ आता लवकरच भूसंपादन सुरू होणार आहे. यामुळे पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच या औद्योगिक महामार्गाची भेट मिळेल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.
राज्य सरकारने नुकतीच दिली मंजुरी
पुणे ते नाशिक दरम्यान 213 किलोमीटर लांबीचा औद्योगिक महामार्ग विकसित होणार आहे. हा महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळ डेव्हलप करणार आहे. यासाठी 8,981 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. राज्य सरकारने गेल्या महिन्यात अर्थातच फेब्रुवारी महिन्यात या महामार्गाच्या अंतिम आखणीला मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
दरम्यान, आता या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनी अधिग्रहित करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून भूसंपादन अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती या ठिकाणी पूर्ण झाली आहे. या महामार्गासाठी १७१० हेक्टर जमीनीचे भूसंपादन केले जाणार आहे.
पुणे ते नाशिक प्रवास होणार वेगवान
पुणे ते नाशिक दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र पुणे ते नाशिक असा थेट रेल्वे मार्ग अजूनही विकसित झालेला नाही. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करण्यासाठी अजूनही रस्ते मार्गानेच प्रवास करावा लागतोय. सध्या स्थितीला मात्र पुणे ते नाशिक हा प्रवास करण्यासाठी पाच तासांचा मोठा कालावधी प्रवाशांना खर्च करावा लागतोय.
परंतु जेव्हा हा औद्योगिक महामार्ग विकसित होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी दोन तासांवर येणार आहे. म्हणजेच या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करताना प्रवाशांचा तीन तासांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.
ही शहरे जोडली जाणार
हा महामार्ग नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांना कनेक्ट करणार आहे. राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर ही महत्त्वाची शहरे या महामार्गामुळे परस्परांना जोडली जाणार आहेत. यामुळे या तिन्ही जिल्ह्यांमधील कृषी, उद्योग, शिक्षण, पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना उभारी मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
कसा असणार रूट ?
या महामार्गाचा रूट कसा असणार असा प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा महामार्ग 213 किलोमीटर लांबीचा राहील. पुणे ते शिर्डी असा 134 किलोमीटर लांबीचा मार्ग असेल, तसेच शिर्डी इंटरचेंज ते निफाड इंटरचेंज हा 60 किलोमीटरचा मार्ग सुरत चेन्नई ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे चा भाग राहणार आहे.
तसेच यापुढे निफाड राज्य महामार्गाचा चेन्नई-सुरत महामार्ग ते नाशिक असा 18 किलोमीटरचा भाग राहणार आहे. अशा तऱ्हेने या महामार्गाची एकूण लांबी 213 किलोमीटर एवढी राहील. या महामार्गाला लागून 37 किलोमीटर लांबीचे जोड रस्ते देखील तयार करण्याचे नियोजन राज्य रस्ते विकास महामंडळाचे आहे.