Pune-Nashik Railway : पुणे-नासिक-मुंबई ही तिन्ही शहरे राज्याच्या विकासाची सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखली जातात. मात्र असे असले तरी आजही पुणे ते नाशिक असा थेट प्रवास करण्यासाठी रेल्वे मार्ग नाहीये. त्यामुळे नाशिकचा विकास हा थोडासा मंदावला आहे.
मुंबई आणि पुण्याशी तुलना केली असता नाशिकचा विकास हा तुलनेने कमी असल्याचे भासते. दरम्यान, नासिक ते पुणे हा प्रवास रेल्वे मार्ग नसल्याने खूपच आव्हानात्मक बनला आहे.
वास्तविक पुणे ते नाशिक आणि नाशिक ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे. मात्र तरीही या दोन्ही शहरा दरम्यान अजून थेट रेल्वे मार्ग तयार झालेला नाही.
यामुळे ही दोन्ही शहरे रेल्वे मार्गाने कनेक्ट झाली पाहिजेत अशी मागणी नागरिकांची आहे. सरकारने देखील ही दोन्ही महत्त्वाचे शहरे परस्परांना जोडण्यासाठी पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित केला आहे.
या प्रकल्पाची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. मात्र याचे काम अजूनही सुरू झालेले नाही. यामुळे हा प्रकल्प बारगळला की काय असे बोलले जात होते.
कधी या प्रकल्पाच्या कामाला गती मिळत असे तर कधी या प्रकल्पाच्या फाईल्स कुठे ना कुठे अटकत होत्या. यामुळे या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली होती.
मात्र केंद्र शासनाने एक फेब्रुवारी 2024 ला सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पाबाबत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद करून देण्यात आली आहे.
म्हणून आता या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण होणार अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
त्यामुळे नासिक आणि पुणेकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा आता पूर्ण होणार आणि लवकरच या रेल्वेमार्गाचे काम सुरू होणार अशी आशा आहे.
या प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद झाली असल्याने आता या लोहमार्गाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होईल असे चित्र तयार होत आहे.