Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. खरे तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मेट्रोचे जाळे विकसित करण्यावर शासन आणि प्रशासनाचा विशेष जोर आहे.
मात्र असे असेल तरी संपूर्ण शहरात मेट्रोचे जाळे विकसित होण्यासाठी आणखी बराच वर्षांचा काळ लागणार आहे. शिवाय, प्रत्येकच ठिकाणी मेट्रोने जाता येणे शक्य होणार नाही.
यामुळे मेट्रो सोबतच पीएमपीएलच्या बस सेवा देखील शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आधीसारखीच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
यामुळे PMP कडून शहरातील नागरिकांचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या बसेस सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सेवा देत आहेत. 2018 मध्ये पी एम पी च्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस आली.या गाड्यांना शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देखील दाखवला आहे.
या गाड्यांमधून लाखो नागरिक प्रवास करत आहेत.यामुळे गदगद झालेल्या पीएमपी प्रशासनाने आता शहरात इलेक्ट्रिक डबल डेकर बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
PMP च्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक डबल डेकर बस येणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये 20 इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरु होणार आहेत.
यापैकी 12 बस पुण्यात आणि आठ बस पिंपरी चिंचवड मध्ये चालवल्या जाणार आहेत. या बसेस वातानुकूलित म्हणजेच एसी बस राहणार आहेत.
येत्या तीन ते चार महिन्यात या गाड्या सुरू होतील असा आशावाद व्यक्त होत आहे. यामुळे लवकरच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना डबल डेकर इलेक्ट्रिक बसने प्रवास करता येणार असल्याचे चित्र आहे.
या डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बस मधून आता पुणे शहराचे दर्शन घेता येणार आहे. यामुळे शहरात दाखल होणाऱ्या पर्यटकांमध्ये ही गाडी विशेष लोकप्रिय बनेल अशी आशा आहे.