Pune News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्यात लवकरच लंडन सारख्या बसेस धावणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित डबल डेकर बस आता आपल्या पुण्यात धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
खरे तर गेल्या दीड वर्षांपासून डबल डेकर बस खरेदी करण्याच्या पीएमपीच्या प्रक्रियेला ब्रेक लागला होता. यामुळे पुण्यात डबल डेकर बस धावणार की नाही हा मोठा सवाल होता. मात्र आता पुण्यातील डबल डेकर बस संदर्भात मोठी अपडेट समोर आली असून तब्बल दीड वर्षाच्या खंडानंतर या बसेस खरेदी होणार आहेत.
यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. पुढील आठवड्यात या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. 100 इलेक्ट्रिक बस खरेदी होतील आणि यातील 20 इलेक्ट्रिक बस या डबल डेकर राहणार आहेत.
खरे तर डिसेंबर 2022 मध्ये म्हणजेच दीड वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक अन डबल डेकर बस खरेदी बाबतचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तदनंतर या प्रकरणात कोणतीचं डेव्हलपमेंट झाली नाही.
आता मात्र पुढील आठवड्यापासून यासाठीची निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. मात्र असे असले तरी प्रत्यक्षात या प्रक्रियेला आणखी सहा महिन्यांचा कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे.
म्हणजेच सहा महिन्यानंतर प्रत्यक्षात पुण्याच्या रस्त्यांवर डबल डेकर बस पाहायला मिळू शकते. पहिल्या टप्प्यात वीस डबल डेकर बस धावणार आहेत. नवीन डबल डेकर बस ही इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित राहणार आहे. या गाडीला दोन जीने राहणार आहेत.
या गाडीचा लुक हा हुबेहूब लंडनमध्ये धावणाऱ्या डबल डेकर बस सारखा राहू शकतो असा दावा होत आहे. या गाडीमध्ये 70 प्रवाशांची क्षमता राहणार असून या गाडीने प्रवास केल्यास लंडनमध्ये प्रवास करण्यासारखा अनुभव घेता येणार आहे.
या बसची किंमत दोन कोटी रुपये एवढी राहणार असून प्रवाशी क्षमता 70 लोकांची असली तरी देखील यामध्ये शंभर प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. नक्कीच या गाडीमुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होणार आहे.
या गाडीचा पर्यटकांना देखील मोठा फायदा होणार आहे. ही गाडी नक्कीच पुण्याच्या वैभवात भर घालण्याचे काम करणार आहे. पर्यटकांना या गाडीने प्रवास करताना पुण्याची सुंदरता अनुभवता येणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांसाठी ही डबल डेकर गाडी एक आकर्षणाचा देखील विषय राहणार आहे.