Pune News : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शहरी भागात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातील घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सर्वसामान्यांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करताना अडचणी येत आहेत.
मात्र आता सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार आहे. कारण की, म्हाडा पुणे मंडळाने या वर्षातील घरांसाठीची दुसरी लॉटरी जाहीर केली आहे. म्हाडा प्राधिकरणाने 5863 घरांसाठी सोडत काढली असून याची ऑनलाइन संगणकीय लॉटरी ऑक्टोबर महिन्यात काढली जाणार आहे.
यासाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या भागातील घरांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान या ऑक्टोबर महिन्यातील लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रिया सुरू झाली आहे.
इच्छुक नागरिकांना या सोडतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करण्याचे आवाहन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी केले जात आहे. दरम्यान आज आपण या पुणे मंडळाच्या सोडतीबाबत आवश्यक सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं आहे सोडतीच वेळापत्रक
या सोडतीसाठी 5 सप्टेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिवशीच या सोडतीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
5 सप्टेंबर दुपारी बारा वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून 26 सप्टेंबर 2023 सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू राहणार आहे. तसेच या 5863 घरांसाठी 18 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता संगणकी लॉटरी काढली जाणार आहे.
कोणत्या घरांचा राहणार समावेश?
मिळालेल्या माहितीनुसार या ऑक्टोबरच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील ५४२५ सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील ६९ सदनिका, सांगली जिल्ह्यातील ३२ सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या सोडतीत समाविष्ट असलेल्या घरांमध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेच्या ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २५८४ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेंतर्गत २४४५ सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे.
घरांच्या किमती काय राहणार?
मीडिया रिपोर्ट नुसार पुणे मंडळाच्या या ऑक्टोबर महिन्याच्या सोडतीत सदनिकांच्या किमती पाच लाखांपासून ते एक कोटी अकरा लाख रुपयांपर्यंत राहणार आहेत. सर्वात स्वस्त घर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या परिसरात राहणार आहे.
घराचे आकारमान कसं आहे?
या सोडतीमध्ये वन आरके, वन बीएचके, टू बीएचके आणि थ्री बीएचके घरांचा समावेश करण्यात आला आहे. या सोडतीत सर्वात लहान घर 204 चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळाचे आहे. तर सर्वात मोठे घर १०८७ चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळाचे आहे.
अर्ज कसा करणार?
या घरांच्या लॉटरीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. https://housing.mhada.gov.in/ या लिंक वर जाऊन इच्छुकांना आपला अर्ज सादर करता येणार आहे. मात्र ऑनलाइन अर्ज सादर करताना इच्छुकांना महत्त्वाची कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.