Pune News : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी आहे. खरेतर गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. रस्ते वाहतूक सुधारण्यावर शासन आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून याचाच एक भाग म्हणून वरंध घाटातील दुरुस्ती आणि विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा घाट पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा मार्ग आहे. हा घाट पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडतो. रायगड मधील महाड येथून या घाट मार्गाने पुण्याला येणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
तसेच पुणे जिल्ह्यातून रायगडकडे जाणारे प्रवासी देखील याच घाट मार्गाने प्रवास करतात. आता मात्र महाराष्ट्रातील हा महत्त्वाचा घाट मार्ग काही काळासाठी बंद राहणार आहे.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाडकडून पुण्याकडे जाणाऱ्या वरंध घाटात राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांचे मार्फत संरक्षक भिंत आणि रस्ता दुपदरीकरणाचे काम केले जात आहे.
हे काम वरंध घाट ते रायगड जिल्हा हद्द या दरम्यान होत आहे. पण, घाट सेक्शन मध्ये अरुंद रस्ता आहे आणि खोल दरी देखील आहे म्हणून संरक्षक भिंत आणि रस्ता दुपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असतांना येथे वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक असू शकते.
हेच कारण आहे की हा रस्ता दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात या रस्त्यावर वाहतूक बंद राहणार आहे. वरंध घाट 30 मे 2024 पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतची अधिसूचना देखील रायगड जिल्हाधिकारी महोदय यांनी जारी केली आहे. यामुळे आता रायगड मधून पुण्यात जाणाऱ्या प्रवाशांना आणि पुण्यातून रायगडला जाणाऱ्या प्रवाशांना इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
हा घाट 30 मे पर्यंत बंद राहणार असल्याने आता प्रवाश्यांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगांव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे असा प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच प्रवाशांनी पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा प्रवास करावा असे सांगितले गेले आहे. शिवाय, कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे.
हा घाट मार्ग पुढील दोन महिन्यांसाठी बंद राहणार असल्याने पुण्यातील आणि रायगड मधील प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मात्र वाहतूक बंद ठेवण्यात आली असल्याने वरंध घाटातील काम जलद गतीने पूर्ण होईल अशी आशा आहे.