Pune News : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांच्या चर्चा पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यात की, लगेचच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत.
अशातच मात्र तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एका ठिकाणी काम करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांचा देखील कार्यकाळ संपत आला आहे.
खरंतर देशमुख यांना कार्यकाळापेक्षा अधिक काळ काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी केलेल्या कामाचा गौरव म्हणून शासनाने त्यांना अधिक काळ काम करण्याची संधी दिलेली आहे.
विशेष म्हणजे त्यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाचे आणि कौतुकास्पद असे काम केले आहे. आता मात्र देशमुख यांची सचिव पदासाठी नियुक्ती होणार आहे.
त्यामुळे त्यांच्या जागी कोण येणार हा मोठा सवाल आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कोणाची वर्णी लागणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
अशातच मात्र अजितदादांनी पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी कोणाची वर्णी लागू शकते याचे संकेत देण्यास सुरुवात केली आहे.
खरेतर साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी येता का पुण्याला म्हणून विचारणा केली आहे. तेव्हापासून जितेंद्र डुडी यांचे नाव पुण्याचे जिल्हाधिकारी पदासाठी चर्चेत आले आहे.
याशिवाय राज्याचे क्रीडायुक्त सुहास दिवसे यांचे देखील नाव पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी चर्चेत आहे. हे देखील अधिकारी म्हणून अजित पवार यांच्या पसंतीस खरे उतरलेले आहेत.
तसेच ‘सिडको’चे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, कोकण विभागीय आयुक्तालयातील अपर आयुक्तावरून नव्या पदाच्या प्रतीक्षेत असलेले किसन जावळे, नोंदणी मुद्रांक महानिरीक्षक हिरालाल सोनवणे हे देखील अधिकारी पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी शर्यतीत आहेत.
दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांची साथ आहे. शेखर सिंह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुडबुकमधील आहेत. त्यामुळे आता पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर कोणाची वर्णी लागणार हे खरंच पाहण्यासारखे राहणार आहे.