Pune Railway : राजधानी मुंबई प्रमाणेचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थातच पुण्यातही गेल्या काही वर्षांमध्ये लोकसंख्येचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखतात. यासोबतच स्पर्धा परीक्षांचे केंद्र आणि आयटी कंपन्यांचे हब म्हणूनही पुण्याला ओळख प्राप्त झाली आहे. यामुळे शिक्षण, रोजगार, उद्योग, पर्यटन या निमित्ताने पुण्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक पुण्यात ये-जा करत असतात. यामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असतो शिवाय याचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे.
यामुळे अनेक जण रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. ज्येष्ठांपासून ते तरुणांपर्यंत साऱ्यांनाच रेल्वेचा प्रवास आवडतो. सर्वसामान्य नागरिक देखील खिशाला परवडणारा प्रवास म्हणून रेल्वेने प्रवास करतात. हेच कारण आहे की आता पुणे शहरात रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेच्या माध्यमातून शहरातील रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार असून यासाठी नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून देण्यात आलेली आहे. खरतर गेल्या काही वर्षांपासून पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा मोठा भार पाहायला मिळतोय.
यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय. म्हणून आता पुणे रेल्वे स्थानकावरील हा ताण कमी करण्यासाठी शहरात चार नवीन रेल्वे टर्मिनल विकसित केले जाणार आहे.
यामुळे रेल्वेने पुणे शहरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली होती.
या पत्रकार परिषदेत रेल्वेमंत्र्यांनी पुण्यात चार ठिकाणी नवीन रेल्वे टर्मिनल विकसित केले जाणार अशी माहिती दिली आहे. रेल्वेमंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे हडपसर, शिवाजीनगर, उरळी आणि खडकी या चार ठिकाणी रेल्वेचे नवीन टर्मिनल तयार केले जाणार आहेत.
नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी केलेल्या तरतुदीतून या चार नवीन टर्मिनलची कामे केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या टर्मिनलवरून रेल्वे गाड्या जातील तसेच तेथून सुटणाऱ्या गाड्या पुणे मुख्य रेल्वे स्थानकांवर येणार आहेत. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी होणार आहे.
निश्चितच, रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे पुण्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून पुणेकरांच्या माध्यमातून लवकरात लवकर हे चार नवीन रेल्वे टर्मिनल विकसित झाले पाहिजेत अशी मागणी यावेळी उपस्थित करण्यात आली आहे.