Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या कॉमन बनली आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांना एक दोन किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीत सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी याकरिता पुणे शहरात वेगवेगळे रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
यानुसार, पुणे शहरात दोन नवीन रिंग रोड तयार केले जाणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच पीएमआरडीएच्या माध्यमातून एक रिंग रोड तयार केला जाणार आहे आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून एक रिंग रोड विकसित होणार आहे. सध्या स्थितीला राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोडचे भूसंपादनाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाचा रिंग रोड पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात तयार केला जाणार आहे. सध्या या रिंग रोडच्या पश्चिम भागातील जमिनीचे संपादनाचे काम सुरू आहे. अशातच आता पीएमआरडीएच्या रिंगरोडबाबत महत्त्वाची अशी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे पीएमआरडीएच्या रिंग रोड साठी देखील जमिनीच्या भूसंपादनाचे काम जलद गतीने सुरू होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या रिंग रोडच्या जमिनी संपादनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सोलू, निरगुडी आणि वडगाव या तीन गावांमधील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. यासाठी सध्या या तीन गावांमधील जमिनीच्या मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या तीन गावांमध्ये जवळपास 28 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
सुरुवातीला पीएमआरडीएचा रिंग रोड देखील राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोड प्रमाणे 110 मीटर रुंदीचा करणे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र यानंतर या रिंग रोडची रुंदी कमी करून 65 मीटर एवढी करण्यात आली आहे. या पीएमआरडीएच्या रिंग रोड साठी एकूण 720 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात किती जमीन होणार संपादित?
पहिल्या टप्प्यात या रस्त्यासाठी सोलू मधील 13.17 हेक्टर, निरगुडीमधील 9.32 हेक्टर, वडगाव शिंदे गावातील 5.71 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सोलू ते वडगाव शिंदे दरम्यान 4.8 किलोमीटरचा रस्ता तयार केला जाणार आहे.
या पी एम आर डी ए च्या अंतर्गत रिंग रोडची लांबी 83 किलोमीटर एवढी राहणार आहे. यासाठी खेड, मुळशी, हवेली आणि मावळ या तालुक्यातील 45 गावांमधील 720 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे.