Pune Successful Farmer : अलीकडे शेती करतांना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सातत्याने वाढत असलेल्या कृषी निविष्ठांच्या किमती, वाढलेले इंधनाचे दर, वाढलेले शेतमजुरीचे दर यामुळे शेती व्यवसाय आता परवडत नसल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे एकीकडे उत्पादन खर्च वाढत आहे तर दुसरीकडे अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, दुष्काळ यांसारख्या नानाविध संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. परिणामी आता शेतीचा व्यवसाय मोठा रिस्की बनला आहे. यातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची हमी राहिलेली नाही.
परिणामी अनेक नवयुवक तरुणांनी शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला असतानाही शेती सोडून वेगळी वाट निवडली आहे. बहुसंख्य नवयुवक तरुणाता शेतीला राम राम ठोकत इतर उद्योगधंद्यांमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. मात्र या विपरीत परिस्थितीतही राज्यात असेही अनेक शेतकरी पाहायला मिळत आहेत ज्यांनी आजही काळ्या आईशी इमान राखला आहे.
आजही शेतीमध्ये नानाभित संकटांचा सामना करून अनेक प्रयोगशील शेतकरी लाखोंची कमाई करत आहेत. अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीचा व्यवसाय कसा फायदेशीर ठरू शकतो हे दाखवून दिले आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातही असाच एक नवखा आणि कौतुकास्पद प्रयोग समोर येत आहे.
जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे मौजे कचरवाडी येथील प्रयोगशील शेतकरी पांडुरंग बराळ यांनी पारंपारिक पिकांमागे न लागता नवीन नगदी पिकाची शेती सुरू केली आहे. पांडुरंग यांनी आपल्या कुटुंबाच्या मदतीने ब्राझिलियन फ्रुट ची लागवड केली आहे. त्यांनी प्रामुख्याने ब्राझील देशात आढळणाऱ्या पॅशन फ्रूटची यशस्वी शेती करून दाखवली आहे.
त्यांना आता या पिकाच्या शेतीमधून लाखों रुपयांचे उत्पन्न देखील मिळाले आहे. यामुळे सध्या त्यांची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. पांडुरंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी युट्युब वर राजस्थान मधील एका शेतकऱ्याने पॅशन फ्रुटची यशस्वी लागवड केली असल्याचे बघितले.
यानंतर त्यांनी राजस्थानला जाऊन या पिकाच्या लागवडी बाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना फारशी माहिती मिळाली नाही. परंतु जेवढे माहिती त्यांना कलेक्ट करता आली तेवढी माहिती त्यांनी जमवली. काही माहिती त्यांनी युट्युब वरून घेतली.
यानंतर त्यांनी त्यांच्या साडेतीन बिघा जमिनीवर 100 पॅशन फ्रुट ची रोपे लावली. विशेष म्हणजे त्यांनी या पॅशन फ्रुटची रोपे बियाणे मागवून घरच्या घरी तयार केलेत. रोपे तयार झाल्यानंतर त्यांनी रोपांची लागवड केली. साडेतीन बिघा जमिनीत त्यांनी सात बाय दहा अंतरावर रोपांची लागवड केली.
रोपांची लागवड केल्यानंतर सुमारे चार महिन्यांनी पिकाला हिरव्या रंगाची फळे येऊ लागलीत. दरम्यान या फळांची आता हार्वेस्टिंग सुरू झाली आहे. या फळांची विक्री मुंबई आणि पुण्यासारख्या बाजारात केली जात आहे. याला तिथे 130 ते 150 रुपये प्रति किलो असा दर याला मिळत आहे. पण अमेझॉन सारख्या ऑनलाइन शॉपिंग साइट्स वर आणि मॉलमध्ये या फळांची चढ्या दराने विक्री होते.
त्यांनी याच ठिकाणी आपला मालविक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी त्यांच्या उत्पन्नाचा आकडा वाढला आहे. त्यांना साडेतीन बिघा जमिनीतून जवळपास तीन ते चार टन एवढे उत्पादन मिळणार आहे. म्हणून याच्या विक्रीतून त्यांना जवळपास चार लाखांपर्यंतचा नफा मिळणार असा अंदाज आहे.