Pune To Ayodhya Bus : श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्रीरामांचे मंदिर 22 जानेवारी 2024 पासून संपूर्ण जगभरातील राम भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. जवळपास पाच दशकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभू श्री राम भव्य अशा मंदिरात विराजमान झाले आहेत. यामुळे जगभरातील रामभक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे.
अयोध्या येथे जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घ्यावे अशी अनेक राम भक्तांची इच्छा आहे. यासाठी रोजाना अयोध्या मध्ये हजारो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. यामुळे अयोध्या नगरी दुमदुमली आहे. श्रीक्षेत्र अयोध्या येथील राम मंदिर खुले होऊन आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
तरीदेखील अयोध्या येथे जाणाऱ्या राम भक्तांची संख्या काही कमी झालेली नाही. याउलट दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.याच पार्श्वभूमीवर आता राम भक्तांसाठी भारतीय रेल्वेकडून आस्था विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत.
या रेल्वे गाड्यांमुळे रामभक्तांचा प्रवास निश्चितच सुलभ आणि जलद झाला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे भाविकांना जलद गतीने श्री क्षेत्र अयोध्याला जाऊन दर्शन घेता येणे शक्य होत आहे. विशेष बाब म्हणजे भारतीय रेल्वेनंतर आता एसटी महामंडळाने देखील मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता जर 50 ते 55 भाविकांचा ग्रुप असेल आणि त्यांना श्रीक्षेत्र अयोध्याला जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घ्यायचे असेल तर एसटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणजेच आता लालपरीने रामरायाच्या दर्शनासाठी जाता येणे शक्य होणार आहे.
एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे भाविकांना प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घेणे सोपे होणार आहे यात शंकाच नाही. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यातील उत्तर महाराष्ट्र विभागाच्या धुळे जिल्ह्यातून पहिली बस दर्शनासाठी सोडण्यात आली होती.
त्याच धर्तीवर आता पुणे जिल्ह्यातूनही मागणीनुसार बसेस सोडल्या जातील, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर भाविकांचा ५० जणांचा ग्रुप असेल तर त्यांच्या मागणीनुसार आणि सोयीनुसार पाहिजे ती गाडी देण्यात येणार आहे.
तिकीट दर कसे राहणार
एसटी महामंडळाचा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्री क्षेत्र अयोध्यासाठी जाणार्या भाविकांकडून किलोमीटर प्रमाणे भाडे आकारले जाणार आहे. ५६ रुपये प्रतिकिलोमीटर असे भाडे आकारले जाणार अशी माहिती महामंडळाने दिली आहे.
मात्र प्रवासासाठी किमान ५० प्रवाशांचा ग्रुप असायला पाहिजे. या प्रवासासाठी चांगल्या गाड्या देण्यात येतील. तसेच सोबत दोन चालक असतील. या यात्रेदरम्यान तीन-चार मुक्काम होतील.
आरामदायी प्रवासासाठी शिवशाही तर ज्यांना स्वस्तात प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी मागणीप्रमाणे साधी लालपरी बसही देण्यात येईल, अशी माहिती महामंडळाकडून यावेळी मिळाली आहे. भाविकांना बस हवी असल्यास स्थानिक आगारात संपर्क साधावा लागणार आहे.