Pune Vande Bharat Train News : पुणेकरांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. ती म्हणजे राज्याच्या सांस्कृतिक राजधानीला अर्थातच पुण्याला लवकरच चार नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या वर्षाच्या अखेरीस अर्थातच डिसेंबर 2024 पर्यंत किंवा या चालु आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच मार्च 2025 पर्यंत पुण्याला चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळू शकतात. जर असे झाले तर निश्चितच पुणेकरांसाठी ही मोठी भेट ठरणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाई स्पीड ट्रेन आहे.या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली. सर्वप्रथम ही गाडी देशाची राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली ते वाराणसी यादरम्यान चालवली गेली. या ट्रेनला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दाखवला. यामुळे गदगद झालेल्या भारतीय रेल्वेने देशातील इतरही अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थातच आचारसंहितापूर्वी देशाला दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली असून या गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे.सध्या स्थितीला देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
यापैकी आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर, इंदोर ते नागपूर या महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन सुरू आहे.
अर्थातच आतापर्यंत देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला सहा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. पुण्याच्या बाबतीत मात्र काहीसे उदासीन धोरण पाहायला मिळत आहे. कारण की, मुंबई ते सोलापूर दरम्यान सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस ही एकमेव गाडी पुण्यावरून सुरु आहे.
वंदे भारत एक्सप्रेसला आता जवळपास पाच वर्षांचा काळ पूर्ण होत आला आहे मात्र तरीही पुणे रेल्वे स्थानकावरून अजून थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही. यावरून राज्याच्या सांस्कृतिक राजधानीसंदर्भात सरकारचे उदासीन धोरण अधोरेखित होत आहे. पण आता पुण्यावरूनही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार, पुणे ते बेळगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बडोदा या चार महत्त्वाच्या मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन सुरू होऊ शकते. याला रेल्वे बोर्डाने अजून दुजोरा दिलेला नाही. परंतु या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता दाट आहे.
दरम्यान पुण्यातील घोरपडी येथे वंदे भारत एक्सप्रेससाठीचे मेंटेनन्स डेपो विकसित होणार असल्याची बातमी समोर आली आहे. हा डेपो तयार झाला तर हा मध्ये रेल्वे मार्गावरील फक्त दुसराच डेपो राहणार आहे. यामुळे पुण्यातून थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकणार आहे.
डेपो विकसित झाल्यानंतर पुण्याहून भविष्यात विविध मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी आशा व्यक्त होत आहे. खरेतर, पुण्याहून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे मात्र लगेचच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता नगण्य आहे.
याचे कारण म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करायची असेल तर पुण्यात मेन्टेनन्स डेपो असणे आवश्यक आहे. दरम्यान, या डेपोसाठी आता कुठे हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे जेव्हा हा डेपो विकसित होईल तेव्हाच थेट पुणे रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस धावेल असे काहीसे चित्र सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे.