Vande Bharat Railway : भारतीय रेल्वे एक मोठा निर्णय घेणार आहे. रेल्वे एकाच वेळी तीन वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च करणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील एक मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी संपूर्ण भारतीय बनावटीची असून या गाडीचा कमाल वेग 160 किलोमीटर प्रतितास एवढा आहे.
तथापि, ही गाडी एवढ्या कमाल वेगात अजूनही चालवली जात नाही. सध्या वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर चालवली आहे. विशेष म्हणजे 2047 पर्यंत देशात चार हजार पाचशे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असा दावा केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी केला आहे. तर मीडिया रिपोर्ट मध्ये मार्च 2024 पर्यंत 75 नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकतात असे बोलले जात आहे.
या गाडीची लोकप्रियता पाहता देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून देशातील तीन महत्त्वाच्या मार्गावर एकाच वेळी ही गाडी सुरू करण्याचा प्लॅन रेल्वेने आखला असल्याचे वृत्त समोर आले आहे.
कोणत्या मार्गांवर धावणार
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला वंदे भारत ट्रेन : मीडिया रिपोर्ट नुसार या मार्गावर लवकरच ही हाय स्पीड ट्रेन चालवली जाणार आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच पश्चिम रेल्वेने या मार्गावर 15 किलोमीटरची ट्रायल रन पूर्ण केली आहे. यामुळे आता या मार्गावर लवकरच ही गाडी सुरू होईल आणि या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास जलद होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
सिकंदराबाद-पुणे वंदे भारत ट्रेन : सध्या मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्या मार्गे चालवली जात आहे. मात्र थेट पुण्याहून एकही वंदे भारत ट्रेन सुरू झालेली नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये सिकंदराबाद ते पुणे या मार्गावर ही गाडी सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या या मार्गावर शताब्दी एक्स्प्रेस सुरु आहे. शताब्दीला या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी 8.25 तास लागतात. पण, वंदे भारत सुरू झाल्यानंतर प्रवासाचा हा कालावधी बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे.
बेंगळुरू-कोइम्बतूर : या मार्गालाही लवकरच नवीन वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असा दावा एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. लाइव्ह मिंटमध्ये याबाबत एक वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर वृत्तानुसार, या मार्गावर प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता आणि प्रवाशांची वंदे भारत एक्सप्रेसची मागणी पाहता रेल्वे या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन चालवणार आहे. मात्र ही गाडी केव्हा सुरू होणार याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.