Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे सत्र आता थांबले आहे. यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे. खरे तर, राज्यात तापदायक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचत आहे. काही भागात तर याहीपेक्षा अधिकच्या तापमानाची नोंद होत आहे. यामुळे अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे.
अवकाळी पावसामुळे उष्णता कमी होईल, वातावरणात गारवा तयार होईल अशी आशा होती. परंतु उन्हाची दाहकता एवढी अधिक आहे की अवकाळी पावसामुळे देखील याचे प्रमाण कमी झाले नाही. दरम्यान, कालपासून राज्यातील अनेक भागातून अवकाळी पावसाने माघार घेतली आहे.
तथापि हवामान खात्याने राज्यात आज काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आजपासून हवामान कोरडे राहणार असा दावा केला आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार आज पासून पाच एप्रिल पर्यंत राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
या कालावधीत कुठेच अवकाळी पाऊस हजेरी लावणार नाही असे डख यांनी यावेळी म्हटले आहे. पण, शेतकरी बांधवांनी पाच एप्रिल पर्यंत आपली शेतीची संपूर्ण आवश्यक कामे पूर्ण करण्यावर जोर दिला पाहिजे.
रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन केले जात आहे. कारण की पाच एप्रिल नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
6 एप्रिल पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असे मत पंजाबरावांनी यावेळी वर्तवले आहे. सहा एप्रिल ते आठ एप्रिल दरम्यानच्या तीन दिवसांच्या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या कालावधीत सध्या जसा पाऊस पडतोय त्यापेक्षा अधिकची तीव्रता असणारा पाऊस पडणार आहे. म्हणजेच 6 एप्रिल, 7 एप्रिल आणि 8 एप्रिलला बरसणारा पाऊस हा अधिक तीव्र राहील असे मत पंजाबरावांनी व्यक्त केले आहे.
पंजाबराव निवडणुकीच्या आखाड्यात
दरम्यान पंजाबरावांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. पंजाबराव यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.
यामुळे पंजाबराव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी फॉर्च्यूनर ही गाडी खरेदी केली होती. तेव्हा देखील त्यांची मोठी चर्चा झाली आणि आता ते निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत यामुळे त्यांची चर्चा होणे स्वाभाविक आहे.
परिणामी आता परभणी लोकसभा मतदारसंघाकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे. या लोकसभेतून कोणाला विजयी सलामी मिळते हे पाहण्यासारखे राहील.