Ram Mandir Inauguration : सध्या संपूर्ण देशात, नव्हे-नव्हे तर संपूर्ण जगात राम भक्त प्रभू श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. कारण की पाच शतकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभू श्रीराम श्री क्षेत्र अयोध्या येथे भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत.
राम जन्मभूमीच्या विवादित जागेबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन सुनावणीत सदर जागा प्रभू श्रीरामांची जन्मस्थळी असल्याचे माननीय न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर त्या ठिकाणी भव्य राम मंदिराच्या निर्माण कार्याची सुरुवात झाली.
सध्या राम मंदिराचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अजून मंदिराचे काम पूर्ण झालेले नाही. परंतु, राम भक्तांसाठी निर्माणाधीन मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत. उद्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून हा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असून उद्या या सोहळ्याचा शेवटचा दिवस राहणार आहे. यामुळे उद्या जगातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिर राष्ट्राला समर्पित करण्याचा सोहळा थाटात पार पडणार आहे.
या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती प्रार्थनीय राहणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललांचे हे मंदिर राम भक्तांसाठी सुरू होणार आहे.
यामुळे भाविकांमध्ये मोठे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. अशातच महाराष्ट्रातील राम भक्तांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे राज्यातील मराठवाडा विभागातील नागरिकांना सहजतेने प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता यावे यासाठी रेल्वेने काही विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंदिर सुरू झाल्यानंतर मराठवाड्यातील भाविकांना अयोध्या जाणे सोयीचे होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेने मराठवाड्यातून अयोध्यासाठी काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. १४ फेब्रुवारीला नांदेड-अयोध्या (०७६३६) ही विशेष रेल्वे छत्रपती संभाजीनगरमार्गे धावणार आहे.
परतीच्या प्रवासात ही विशेष गाडी 16 फेब्रुवारी 2024 ला श्री क्षेत्र अयोध्या येथून निघणार आहे. ही गाडी पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अंकाई, मनमाड, भुसावळमार्गे अयोध्याला पोहोचणार अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून समोर आली आहे.
याशिवाय १८ फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद-अयोध्या (०७२९७) ही विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही रेल्वे नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खांडवामार्गे अयोध्याला पोहचणार आहे. ही ट्रेन २१ फेब्रुवारीला परतीला अयोध्या येथून निघणार आहे.