Ration Card Document : तुम्हालाही नवीन रेशन कार्ड काढायचे आहे का ? मग आजची बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. खरंतर शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला शासनाकडून माफक दरात अन्नधान्य देखील उपलब्ध करून दिले जात आहे. पण या स्वस्त दरातील अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असते.
याच रेशन कार्डचे वेगवेगळे प्रकार असतात. राज्य सरकार राज्यातील नागरिकांचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करून त्यांना वेगवेगळे प्रकारचे रेशन कार्ड उपलब्ध करून देत आहे. केशरी रेशन कार्ड, पिवळे रेशन कार्ड, अंत्योदय रेशन कार्ड, एपीएल रेशन कार्ड, पांढरे रेशन कार्ड असे रेशन कार्डचे प्रकार आहेत.
रेशन कार्ड मुळे शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून अनुदानित किमतीत अन्नधान्य मिळवता येते. एवढेच नाही तर रेशन कार्डचा उपयोग हा शासकीय दस्तऐवज म्हणूनही केला जातो. विविध शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये सुद्धा याचा वापर होतो.
वेगवेगळे शासकीय डॉक्युमेंट काढण्यासाठी सुद्धा रेशन कार्ड वापरले जाते. याचा ओळखीचा पुरावा म्हणून वापर केला जात असतो. सध्या राज्यात ज्या माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे त्या योजनेसाठीही रेशन कार्ड आवश्यक आहे.
लाडकी बहिण योजनेप्रमाणेच शासनाच्या इतरही अनेक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी रेशन कार्ड उपयोगी ठरते. अशा परिस्थितीत आज आपण रेशन कार्ड काढण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात आणि यासाठी कुठे अर्ज करावा लागतो या संदर्भात अगदी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेशन कार्ड साठी कुठे अर्ज करावा लागणार
रेशन कार्ड हे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातून काढता येते. तसेच यासाठी आता ऑनलाईन अर्ज देखील करता येणे शक्य झाले आहे. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुविधा केंद्रात, आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन किंवा घरबसल्या www.rcms.mahafood.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन रेशन कार्ड साठी अर्ज करता येतो. यासाठी अर्ज करताना अर्जदार व्यक्तीला आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावी लागतात.
मग अर्जदार व्यक्तीला त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे जाऊन एकदा फोटो व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागणार आहे. आता आपण रेशन कार्ड साठी लागणाऱ्या कागदपत्रांची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
रेशन कार्ड साठी कोणते कागदपत्रे लागतात
शिधापत्रिका काढण्यासाठी अर्जदाराला उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला किंवा सातबारा उतारा किंवा वीजबिल, कुटुंबातील ज्या व्यक्तींचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकायचे आहे त्यांचे सर्वांचे आधार कार्ड, १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र जोडावे लागते. तसेच यासाठी चलन भरावे लागते.
रेशन कार्ड मध्ये जर नव्याने जन्मलेल्या लहान मुलांची नावे टाकायची असतील तर यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा त्यांचे आधार कार्ड जोडून अर्ज करावा लागतो. जर समजा नवविवाहित महिलेच्या माहेरच्या रेशन कार्डवरील नाव कमी करून सासरच्या रेशन कार्ड वर नाव टाकायचे असेल तर अशावेळी सासरच्या रेशन कार्ड मधील नाव कमी केल्याचा दाखला सादर करून रेशन कार्ड मध्ये नवविवाहित महिलेचे नाव टाकता येते.