RBI Banking News : गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे बँकेने काही बँकांचे लायसन्स देखील रद्द केले आहे. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आरबीआयने देशातील खाजगी क्षेत्रातील दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
यामुळे सदर बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण असून या दंडात्मक कारवाईचा त्यांच्यावर काय परिणाम होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयने आयसीआयसीआय आणि येस बँक या खाजगी क्षेत्रातील दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
मध्यवर्ती बँकेने असे म्हटले आहे की, या खाजगी क्षेत्रातील दोन्ही बड्या बँकांनी नियमांचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मध्यवर्ती बॅंकेच्या म्हणजे RBI च्या नियमांचे उल्लंघन केले असल्याने येस बँकेला 91 लाखांचा आणि आयसीआयसीआय बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
RBI ने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात आरबीआयने असे म्हटले आहे की ग्राहक सेवा आणि कार्यालयीन खात्यांशी संबंधित मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याने येस बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या बँकेने मिनिमम बॅलन्स मेंटेन न केल्याने अनेक खात्यांमधून शुल्क वसूल केले होते. याशिवाय कार्यालयीन खात्यांमधून बेकायदेशीर कामे होत असल्याचे आरबीआयच्या निदर्शनास आले होते. यामुळे देशाच्या मध्यवर्ती बँकेने येस बँकेला 91 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दुसरीकडे, आयसीआयसीआय बँकेबाबत बोलायचं झालं तर सदर बँकेने कर्ज आणि ॲडव्हान्सशी संबंधित निर्देशांचे उल्लंघन केले आहे. बँकेने अपूर्ण तपासाच्या आधारावर अनेक कर्ज मंजूर केलेत, त्यामुळे बँकेला आर्थिक धोक्याचा सामना करावा लागला.
हेच कारण आहे की, आयसीआयसीआय बँकेवर आरबीआयने एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे खाजगी क्षेत्रातील दोन्ही बँकांच्या ग्राहकांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या कारवाईचा त्यांना देखील फटका बसणार अशी भीती खातेधारकांना आहे.
मात्र आरबीआयने या कारवाईचा ग्राहकांवर कोणताच परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नियमांचे पालन न केल्याने बँकांवर हा दंड ठोठावण्यात आला आहे याचा मात्र ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाहीये.