Samruddhi Mahamarg : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून मुंबई ते नागपूर हा प्रवास सुपरफास्ट व्हावा यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.
आतापर्यंत या मार्गाचे सहाशे किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे उर्वरित काम देखील जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला नागपूर ते भरवीर अशा 600 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले असून हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू देखील झाला आहे.
सुरुवातीला डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला.
यानंतर शिर्डी ते भरवीर हे 80 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आणि हा मार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला.
अशातच आता समृद्धी महामार्गसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाचे भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.
विशेष म्हणजे लवकरच हा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाणार आहे. हा टप्पा फक्त 25 किलोमीटर लांबीचा आहे. मात्र, या 25 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे प्रवाशांचा जवळपास दिड तासांचा कालावधी वाचणार आहे.
इगतपुरीपासून अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावरून समृद्धी महामार्गावर आता प्रवाशांना चढता येणार आहे. परिणामी भिवंडीपासून इगतपुरीपर्यंत नासिक महामार्गावरील वाहतूककोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे.
विशेष म्हणजे इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमने पर्यंतच्या 75 किलोमीटरच्या टप्प्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे.
हे देखील काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे टार्गेट राज्य रस्ते विकास महामंडळाने ठेवले आहे. यामुळे या चालू वर्षात संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊ शकतो अशी आशा व्यक्त होत आहे.