Samruddhi Mahamarg : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते विकासाच्या कामामुळे महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्था ही आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे. अशातच आता महाराष्ट्रात आणखी काही नवीन रस्ते विकासाच्या कामांना सुरुवात होणार अशी बातमी समोर आली आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन्ही राजधानींच्या शहरांना परस्परांना थेट रस्ते मार्गाने कनेक्ट करण्यासाठी समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे.
समृद्धी महामार्ग एकूण 701 किलोमीटर लांबीचा आहे. सध्या स्थितीला यापैकी सहाशे किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक सुरू आहे. म्हणजेच नागपूर ते भरवीर हे सहाशे किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे आणि यावर वाहने धावत सुद्धा आहेत.
दुसरीकडे भरवीर ते इगतपुरी हे 25 किलोमीटर लांबीचे काम देखील पूर्ण करण्यात आले आहे. मात्र हा टप्पा अजून वाहतुकीसाठी सुरू झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच हा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो.
तसेच उर्वरित 75 किलोमीटर लांबीचे काम देखील जलद गतीने सुरु आहे. आता इगतपुरी ते आमने हा समृद्धी महामार्गाचा शेवटच्या टप्प्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होईल, अशी आशा आहे.
अशातच मात्र समृद्धी महामार्गाचा विस्तार प्रस्तावित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गाच्या विस्तारीकरणाला सुरुवात केली आहे.
या विस्तारीकरणामुळे विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे जिल्हे समृद्धी महामार्गाला जोडले जाणार आहेत. या विस्तारीकरणात तीन स्वतंत्र रस्ते तयार केले जाणार आहेत, जे की समृद्धी महामार्गासोबत कनेक्ट राहतील.
एमएसआरडीसीने नागपूर ते गोंदिया या 127 किलोमीटर लांबीच्या ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेस वेच्या बांधकामासाठी निविदा काढली आहे, जो 7,345 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे.
भंडारा ते गोंदिया यांना जोडणारा आणखी 28 किमीचा रस्ता 1,587 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे आणि 194 किमीचा नागपूर ते चंद्रपूर हा मार्ग 9,543.2 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे.
MSRDC नुसार, पूर्वेकडील जिल्ह्यांना राजधानी मुंबई सोबत कनेक्ट करण्यासाठी आणि प्रवासाचा कालावधी वाचावा यासाठी समृद्धी महामार्ग विकसित करण्यात आला आहे. दरम्यान आता या समृद्धी महामार्गाचा देखील विस्तार होणार आहे.