Scheme For Business:- व्यवसाय उभा करायचा राहिला म्हणजे सगळ्यात मोठी समस्या म्हणजे व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक म्हणजेच पैसे होय. तुम्हाला अगदी छोटा किंवा मोठा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर तुम्हाला पैशांची आवश्यकता ही भासतेच. त्यामुळे बरेच व्यक्ती व्यवसाय उभारण्यासाठी विविध माध्यमातून कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात.
याच प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी किंवा व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत व्हावी याकरिता सरकारने देखील अनेक योजना सुरू केलेली आहे. प्रामुख्याने भारतामध्ये स्टार्टप्स सुरू करण्यासाठी देखील काही सरकारी योजना खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येत आहेत.
त्यामुळे या लेखांमध्ये तुम्हाला देखील जर एखादा स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारच्या कोणत्या अशा योजना आहेत की त्यामधून तुम्ही कर्ज घेऊन सुरुवात करू शकतात व तुमचा स्टार्टअप किंवा व्यवसाय वाढवू शकतात.
सरकारच्या या योजना व्यवसाय वाढवण्यासाठी देतील कर्ज
1- स्टँड अप इंडिया योजना– समाजातील तळागाळातील महिला आणि एससी/ एसटी उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे याकरिता स्टँड अप इंडिया लोन योजनेच्या अंतर्गत दहा लाख ते एक कोटी पर्यंतचे कर्ज दिले जाते व ते देखील कुठलेही तारण न देता. हे कर्ज तुम्हाला सात वर्षाच्या कालावधीत परतफेड करायचे असते
व ज्याचा अधिस्थगन कालावधी 18 महिन्याचा असू शकतो. या स्टॅन्ड अप योजनेच्या माध्यमातून तुम्हाला व्यवसाय सुरू करताना पहिल्या तीन वर्षाकरिता आयकर मधून देखील सूट दिली जाते त्यानंतर आधारभूत दरात तीन टक्के व्याजदर आकारला जातो. जो मुदतीच्या प्रीमियम पेक्षा जास्त असू शकत नाही.
2- राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ योजना– एनएसआयसी विपणन, तंत्रज्ञान, वित्त आणि इतर समर्थन सेवांच्या अंतर्गत सेवा प्रदान करते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट असून या योजनेअंतर्गत दोन प्रकारचे कर्ज दिले जाते. यातील पहिली म्हणजे
विपणन सहाय्य योजना
तुम्ही तुमच्या ऑफरचे बाजार मूल्य वाढवण्यासाठी या योजनेअंतर्गत प्राप्त रक्कम वापरू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जाहिरात तसेच मार्केटिंग आणि बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यात मोठी मदत होऊ शकते.
क्रेडिट सहाय्य योजना
या अंतर्गत तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी तसेच आर्थिक मदत व मार्केटिंग इत्यादीसाठी आर्थिक मदत मिळवू शकतात.
3- प्रधानमंत्री मुद्रा योजना– या योजनेअंतर्गत बिगर कृषी लघु व सूक्ष्म उद्योगांना दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिली जाते. हे कर्ज व्यावसायिक बँका, रिझर्व बँक ऑफ इंडिया तसेच लघु वित्त बँक, एमएफआय आणि एनबीएफसी द्वारे दिले जातात. तसेच तुम्ही www.udyammitra.in या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात व ही योजना तीन श्रेणीमध्ये विभागली गेली आहे. या तीन श्रेणीमध्ये
शिशु श्रेणीत पन्नास हजार पर्यंत कर्ज दिले जाते.
किशोरवयीन श्रेणीत 50 हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
तरुण श्रेणीत पाच लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.
4- क्रेडिट गॅरंटी फंड योजना– स्टार्टअप ला चालना देण्यासाठी सरकारच्या क्रेडिट गॅरंटी योजना अंतर्गत स्टार्टअप कंपन्यांना कोणत्याही हमीशिवाय जास्तीत जास्त पाच कोटी रुपयांचे कर्ज मिळते. या योजनेसाठी भरलेली हमी शुल्क मंजूर करून दोन टक्के भरून 0.37% पर्यंत कमी केले आहे.
5- एमएसएमई कर्ज योजना– व्यवसाय मध्ये लागणाऱ्या खेळत्या भांडवलाची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे व या अंतर्गत कोणत्याही नवीन किंवा सुरू असलेल्या उद्योगाला एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळते. साधारणपणे या कर्ज प्रक्रियेला आठ ते बारा दिवसांचा कालावधी लागतो व कर्ज अर्ज मंजूर किंवा नाकारण्यासाठी फक्त 59 मिनिटे लागतात.