Shirdi Sai Baba Temple Viral News : ‘सबका मालिक एक’ अशी शिकवण जगाला देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनाला व्याकुळ साई भक्त वेळोवेळी शिर्डी येथे दर्शनाला जात असतात. श्रीक्षेत्र साईनगर शिर्डी ही साई भक्तांची पंढरी आहे. या ब्रह्मनगरीला साई भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह असतो. शिर्डीत आल्यानंतर साई भक्तांचे सर्व दुःख, ईडा-पीडा, अडचणी दूर होतात.
त्यामुळे दररोज साईनगरी शिर्डी येथे हजारो भाविकांची वर्दळ असते. गुरु पौर्णिमेला या ठिकाणी भाविकांची गर्दी आणखी वाढत असते. साई नामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदुमत असते. मात्र, श्रीक्षेत्र साईनगर शिर्डी येथे असणारे समाधी मंदिर हे साईबाबांचे पहिले मंदिर नाहीये.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यात म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात वसलेल्या शिर्डी या गावात साईबाबांनी समाधी घेतली. येथे साईबाबांचे समाधी मंदिर आहे. मात्र भारतातील पहिले साई मंदिर हे शिर्डीचे नाही. कदाचित तुम्हालाही भारतातील पहिले साई मंदिर कोणते आहे हे माहिती नसेल.
अनेकांना या संदर्भात माहिती नाहीये. कित्येक साई भक्तांना देखील याबाबत माहिती नसणार. यामुळे आज आपण भारतातील पहिल्या साई मंदिराची गोष्ट पाहणार आहोत. हे मंदिर नेमके कुठे आहे, महाराष्ट्रातील कोणत्या गावात पहिले साई मंदिर तयार झाले, हे मंदिर कधी बांधले गेले याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.
कोकणात बांधलय साईबाबांचे पहिले मंदिर
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या गावालगत भारतातील पहिले साई मंदिर बांधले गेले आहे. हे मंदिर कुडाळ रेल्वे स्थानकापासून अर्धा किलोमीटरवर आणि बस स्थानकापासून चार किलोमीटर अंतरावर आहे.
कविलगांव या ठिकाणी असणारे हे मंदिर भारतातील पहिले साई मंदिर म्हणून ओळखले जाते. ज्या लोकांना या मंदिराची माहिती आहे ते भाविक या ठिकाणी आवर्जून भेट देतात.
कोणी बांधलंय भारतातील पहिले साई मंदिर
असं म्हणतात की, कविलगांव गाव येथे राहणारे रामचंद्र रावजी उर्फ दादा मांड्ये यांच्यासोबत साक्षात्कार घडला. रामचंद्र रावजी हे दत्त महाराजांचे भक्त होते. दत्त महाराजांच्या या असीम भक्ताच्या स्वप्नात एके दिवशी दत्त महाराज आलेत आणि दत्त महाराजांनी रावजी यांना शिर्डीला जाण्यास सांगितले.
शिर्डीला गेल्यानंतर त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले आणि यावेळी त्यांना साईबाबांमध्येच दत्त महाराजांचे दर्शन झाले. तेव्हापासून रावजी साईभक्तीत तल्लीन झाले. पुढे 1918 मध्ये साईबाबांनी समाधी घेतली.
पुढे रावजी यांनी साईबाबांचा पुण्यतिथी सोहळा त्यांच्या गावात सुरू केला. कविलगांव येथे 1919 पासून साईबाबांचा पुण्यतिथी सोहळा आयोजित केला जात आहे. आज कविलगाव येथे साईबाबांचे भव्य मंदिर आहे.
त्या काळात मात्र साईबाबांचे मंदिर म्हणजे अगदीचं एक छोटीशी झोपडी होती. पण आज कविलगाव या ठिकाणी साईबाबांचे भव्य मंदिर असून याला कोकणाची शिर्डी म्हणून ओळखले जाते.