Skymet New Weather Update : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
हवामान सातत्याने बदलत असल्याने सध्या नेमका हिवाळा सुरू आहे की पावसाळा हाच मोठा सवाल आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती होती. राज्यात गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला होता.
तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली होती. डिसेंबर महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेचं झाली, मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे झाले आहे.
आता राज्यात हळूहळू गारठा वाढू लागला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असल्याने याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रात देखील गारठा वाढला आहे.
विशेष म्हणजे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आगामी काही दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि थंडीचा जोर आणखी वाढेल अशी स्थिती तयार झाली आहे.
राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान तापमान 11° पर्यंत खाली आले आहे तर विदर्भात देखील किमान तापमान 14° पर्यंत खाली आले आहे. तर दुसरीकडे आज देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आज दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, आणि लक्षद्वीपमध्ये अतिमुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार अशी शक्यता आहे.
पण, आगामी दोन दिवसात तामिळनाडू आणि केरळमधला पाऊस कमी होणार असा अंदाज आहे. पण लक्षद्वीपमध्ये सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार असा अंदाज आहे.
याशिवाय आज तामिळनाडू आणि केरळ मधील उत्तरेकडील भागात आणि अंदमान आणि निकोबारच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार असे सांगितले जात आहे.
तसेच आज आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारी भाग आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असे स्कायमेटने वर्तवलेल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रात कुठेच अवकाळी पाऊस पडणार नाही असा अंदाज आहे. हवामान विभागाने तसेच स्कायमेटने देखील असेच सांगितले आहे.