Snake Bite : सध्या पावसाळ्याचा सिझन सुरू आहे. या सीजन मध्ये भारतात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. पावसाळ्यात बिळात पाणी शिरत असल्याने साप नाईलाजाने बाहेर पडतात. अशावेळी साप जिथे जागा कोरडी असते अशा ठिकाणी आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी साप घराशेजारी अडगळीच्या ठिकाणी किंवा घरात शिरण्याची भीती असते.
यामुळे पावसाळी काळात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना झाल्याचे पाहायला मिळते. एका अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी जवळपास 58 हजार लोक सर्पदंशामुळे मृत्यूमुखी पडतात. यामुळे साप दिसला की त्यापासून लांबच राहिले पाहिजे.
विनाकारण सापाला त्रास देणे हे योग्य नाही. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात सापांच्या तीनशे प्रजाती आढळतात. यातील 60 प्रजाती या विषारी आहेत. उर्वरित प्रजाती ह्या बिनविषारी आहेत. 60 विषारी प्रजाती पैकी चार अशा प्रजाती आहेत ज्या की खूपच धोकादायक मानल्या जातात.
घोणस, फुरसे घोणस, इंडियन कोब्रा आणि मण्यार ह्या सापाच्या सर्वात विषारी प्रजाती आहेत. या सापांच्या प्रजाती जर चावल्यात तर मृत्यू होण्याचा धोका सर्वाधिक असतो. यामुळे साप चावल्यानंतर सर्वप्रथम वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.
तांत्रिका कडे घेऊन जाण्याऐवजी सर्वप्रथम वैद्यकीय उपचार घेणे आणि सर्पदंश झालेल्या व्यक्तीला अँटि व्हेनम देणे आवश्यक आहे. दरम्यान, आता आपण विषारी साप चावला हे कसे ओळखायचे आणि साप चावल्यानंतर ताबडतोब काही उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
विषारी साप चावला हे कसे कळणार ?
तज्ञ सांगतात की, विषारी साप चावल्यानंतर चावलेल्या जागेवर दोन दातांचे निशाण असते. जर समजा सर्पदंश झालेल्या ठिकाणी दोन दातांचे निशान दिसत नसेल तर साप हा बिनविषारी होता अस आपण समजू शकतो.
पण, साप विषारी असो किंवा बिनविषारी दोन्हीही परिस्थितीत अँटी व्हेनम इंजेक्शन घेणे अतिशय आवश्यक आहे. याशिवाय तज्ञ लोक सांगतात की जर विषारी साप चावला तर सर्पदंश झालेल्या ठिकाणी तीव्र जळजळ होते, वेदना होतात आणि ती जागा सुचते.
साप चावल्यानंतर काय करू नये
सर्प दंश झालेल्या ठिकाणी कपडा, दोरा काहीच घट्ट बांधू नये.
सर्प दंश झालेल्या व्यक्तीने दारू, चहा, कॉफी पिऊ नये, असे केल्यास रक्ताभिसरण प्रक्रिया जलद होऊ शकते आणि यामुळे शरीरात विष सुद्धा जलद गतीने पसरते.
सर्पदंश झालेल्या ठिकाणी बर्फ किंवा गरम पदार्थ लावून शेकू नये.
सर्पदंश झालेल्या ठिकाणाहून विष ओढून काढण्याचा प्रयत्न करू नका.
जिथे साप चावला आहे तिथे विनाकारण चिरा मारून विष काढण्याचा प्रयत्न करू नका यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.